सातारा / प्रतिनिधी :
गणपती आगमन मिरवणुकी दरम्यान एका मंडळाच्या डेकोरेशनला लागलेली आग वाहतूक पोलिसाने प्रसंगावधान राखत विझवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून संबंधित वाहतूक पोलिसाचे गणेश भक्तांनी आभार मानले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, शनिवार चौक 501 पाटी येथील जयहिंद गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मोती चौकात आली होती. त्याचवेळी गणेश मूर्तीच्या पाठिमागे असलेल्या डेकोरेशनला अचानक आग लागली. लागलेली आग पाहताच वाहतूक शाखेचे योगेश कृष्णत जाधव यांनी वेळ न दवडता लगोलग एका गणेश भक्ताचा शर्ट घेवून, डेकोरेशनवर चढून आग नियंत्रणात आणून ती कापडाने विझवली. गणपती आगमन सोहळा पाहण्यासाठी मोती चौकात मोठी गर्दी होती. आग विझवल्यामुळे होणारी मोठी दुर्घटना टाळता आली. त्यामुळे उपस्थित गणेश भक्तांनी वाहतूक अंमलदार योगेश जाधव यांचे आभार मानून त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक केले.