काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान : शस्त्रास्त्रांसह पाकिस्तानी चलन जप्त
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात घुसखोरीचा मोठा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला आहे. लष्करासोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना लष्कराने ठार केले आहे. या भागात शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत लष्कराची कारवाई सुरू होती.
कुपवाडामधील माछिल सेक्टरमध्ये कुमकडी भागात काही दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. यावेळी सीमेपलीकडून येणारे दोन घुसखोर मारले गेले. दहशतवाद्यांकडून आतापर्यंत दोन एके रायफल, चार एके मॅगझिन, 90 गोळ्या, एक पाकिस्तानी पिस्तूल, एक पाउच आणि 2100 रूपये किमतीचे पाकिस्तानी चलन जप्त करण्यात आले आहे. या कारवाईनंतर घटनास्थळी शोधमोहीम राबविण्यात आली होती.
कुरापतखोर पाकिस्तानचे कारनामे
सीमेवर आणि अंतर्गत भागात पाकिस्तान समर्थित देशविरोधी घटकांचे नापाक मनसुबे उधळून लावण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सतर्क आणि सक्रिय आहे. जम्मू-काश्मीरच्या लोकांना शांतता हवी असून पाकिस्तानचा खरा चेहरा उघड झाला आहे. पाकिस्तानमधील काही कुरापतखोर यंत्रणा काश्मिरी तरूणांना भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी सांगितले. केंद्रशासित प्रदेशातून दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस आणि इतर सुरक्षा दल कटिबद्ध असल्याचा दावाही त्यांनी केला. सध्या काश्मीरमध्ये सक्रिय दहशतवाद्यांची उपस्थिती कमी झाली असून उर्वरित दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुरक्षा कर्मचाऱ्यांची जीवितहानी रोखता यावी यासाठी आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने कसे उत्तर देता येईल यावर काम करावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.