तळेरे / प्रतिनिधी
युवा शास्त्रीय गायक हर्ष नकाशे याच्या शास्त्रीय गायनाच्या मैफिलीचे आयोजन
तळेरे येथील मधुकट्टयावर युवा शास्त्रीय गायक हर्ष नकाशे याच्या शास्त्रीय गायनाच्या सुरेल मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. संवाद परिवाराने आयोजित केलेल्या या संगीत मैफिलीला पंचक्रोशीतील रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी हर्ष नकाशे यांनी शास्त्रीय गायन, अभंग, नाट्यसंगीत, गझल अशा विविध सादरीकरणाने शास्त्रीय गायनाची सुरेल मैफिल चांगलीच रंगवली होती.
तळेरे येथील संवाद परिवाराच्यावतीने दर महिन्याला साहित्य, सामाजिक, कला विषयक एक उपक्रम आयोजित केला जातो. या महिन्याला नाधवडे येथील युवा शास्त्रीय गायक हर्ष नकाशे यांच्या शास्त्रीय गायनाच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. या मैफिलीचा प्रारंभ कलावती या रागाने करण्यात आली. या रागाला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.
त्यानंतर विविध अभंग, नाट्य गीत, गझल सादर केले. त्या सर्वाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. यावेळी हर्ष नकाशे यांनी दुभंगल्या माझ्या जीवा जोडीतो अभंग, युवती मनाला, बिती विभावरी जागरी, तुम मुझे अपने क्षितिज से, गुंतता हृदय हे, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, माझे चित्त तुझे पायी, ध्यान लागले रामाचे अशा अनेक उत्तम रचना सादर केल्या.प्रत्येक सादरीकरणला रसिकांनी टाळ्यांची भरभरून साद दिली.
यावेळी हर्ष नकाशे यांचा माजी पं.स. सभापती दिलीप तळेकर,तळेरे सरपंच हनुमंत तळेकर,सुर्यकांत तळेकर,ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर,डॉ.मिलिंद कुलकर्णी,चंद्रकांत तळेकर,राजू जठार या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले तसेच पुढिल वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या मैफिलीचे सुत्रसंचालन श्याम सावंत यांनी केले. शेवटी आभार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी मानले.