ऑनलाईन टीम / तरुण भारत :
नागपुरात एका अल्पवयीन मुलीने यू-ट्यूब पाहून घरीच स्वत:ची प्रसूती केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. जन्माला आलेल्या बाळाचाही संशयास्पद मृत्यू झाला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद करुन तपास सुरु केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी पीडित अल्पवयीन मुलीची इंस्टांग्रामवर एका तरुणाशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये चॅटींग होत होते. एक दिवस तरुणाने पीडित मुलीला भेटायला बोलावले आणि तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीने हा संपूर्ण प्रकार आपल्या घरच्यांपासून लपवून ठेवला होता. ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. 3 मार्च रोजी मध्यरात्री तिने यू-ट्यूब पाहून घरीच स्वत:ची प्रसूती केली. प्रसूती झाली तेव्हा ती घरी एकटी होती. सध्या मुलीची प्रकृती चिंताजनक असून, तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बाळ जन्मल्यानंतर त्याचा मृतदेह संशयास्पद ठिकाणी आढळून आला आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर बाळाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहे.