मयत युवक कंथेवाडीचा; ट्राँलीमालकांवर गुन्हा नोंद
भोगावती / प्रतिनिधी
पुंगाव ता. राधानगरी येथील मुख्य रस्त्याकडेला उभा असलेल्या ट्राँलीला धडकल्याने मोटारसायकल स्वार ठार झाला.नारायण मधुकर चांभार-पोवार वय ३५ रा कंथेवाडी ता राधानगरी असे मयत युवकाचे नाव आहे. हा अपघात बुधवारी रात्री ११-३० वाजण्याच्या सुमारास घडला.त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. अपघाताची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झाली असुन ट्राँली मालक विद्याधर बापुसो पाटील यांच्याविरोधात गुन्हा नोदविला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, नारायण हे गांधीनगर येथे कामास होते. रात्री कामावरून सुटल्यानंतर मोटरसायकल क्रमांक MHO9-CX-2492 वरुन ते कंथेवाडीला जात होते. मुख्य रस्त्यावर पुंगाव गावात रस्त्याकडेला उभा असलेल्या चारचाकी ट्राँलीला मोटरसायकलची धडक झाली. अंधारातून ट्राली दिसली नसल्यानेच मोटरसायकलचा हा अपघात घडला असल्याचे समजते. मोटारसायकल ची धडक इतकी जोरात झाली की, यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. पुंगाव गावामध्ये मुख्य रस्त्यावरच सर्रासपणे ट्रक, ट्रँक्टर, ट्राँली पार्कींग केले जातात.रस्त्यामध्ये पार्कींग केलेली वहाने दिसत नसल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडत असतात. अशा पार्कींग केलेल्या ट्राँलीनेच होतकरु नारायणचा बळी घेतला आहे.त्यामुळे रस्त्यावर पार्कींग केलेल्या वहानधारकाना पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाने सुचना देऊन वाहने हटविण्याची मागणी होत आहे.