कुंभारजुवे : आज खोर्ली पंचायत होऊन पन्नास वर्षे उलटली तसेच पंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही या पंचायतीची सुसज्ज इमारत नाही याचा खेद वाटतो. यापुढे आपण पंचायत इमारतीच्या उभारणीबाबत मी जातीने लक्ष घालून वर्षभरात ही इमारत पूर्ण होईल याची जबाबदारी माझी आहे असे आश्वासन कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी दिले खोर्ली तिसवाडी पंचायतीच्या नवीन इमारतीच्या नामफलकाचे अनावरण आमदार फळदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजेश फळदेसाई बोलत होते. याप्रसंगी सरपंच बाप्टिस्ट परेरा, उपसरपंच सुप्रिया केरकर पंचसदस्य चंद्रशेखर काणकोणकर, प्रज्ञा शिरवईकर, विरेश आसोलकर, अंजली चोडणकर, फ्रिडा आयमा पो, काशिनाथ गावकर, गोरखनाथ केरकर सचिव जितेंद्र नाईक व अन्य मान्यवर उपस्थित होते
प्रमुख पाहुणे आमदार राजेश फळदेसाई यांचे सरपंच बाप्टिस्ट परेरा यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सरपंच बाप्टिस्ट परेरा यांनी प्रास्ताविक भाषणात सध्याच्या पंचायत कार्यालयाची व्यथा मांडली. त्यांनी इतर विकास कामांनाही असेच प्राधान्य द्यावे, आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव जितेंद्र नाईक यांनी व आभार पंचसदस्य गोरखनाथ केरकर यांनी मानले. याप्रसंगी आमदार राजेश फळदेसाई यांच्या वाढदिवसाचा केक त्यांनी पंचायत सभागृहात कापला व उपस्थित पंचसदस्य व नागरिकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.