सामनावीर अॅलिसा हिलीच्या नाबाद 96 धावा, बेंगळूरचा सलग चौथा पराभव
वृत्तसंस्था/ मुंबई
येथे सुरू असलेल्या महिलांच्या पहिल्याच प्रिमियर लिग टी-20 क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात कर्णधार आणि ‘सामनावीर’ अॅलिसा हिलीच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर युपी वॉरियर्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा 10 गड्यांनी दणदणीत पराभव केला. या स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघाचा 10 गड्यांनी पराभव करून विजय मिळवणारा युपी वॉरियर्स हा पहिला संघ ठरला आहे.
शुक्रवारच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना त्यांचा डाव 19.3 षटकात 138 धावात धावात आटोपला. बेंगळूर संघाची कर्णधार स्मृती मानधना पुन्हा फलंदाजीत अपयशी ठरली असून ती सूर मिळवण्यासाठी झगडत असल्याचे दिसून आले. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरच्या डावामध्ये ऑस्ट्रेलियाच्या इलेसी पेरीने एकाकी लढत देत 39 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारासह 52 तर सोफी डिव्हाईनने 24 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारासह 36 धावा जमवल्या. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 44 धावांची भागीदारी केली. श्रेयांका पाटीलने 3 चौकारासह 15 तर बर्न्सने 2 चौकारासह 12 धावा केल्या. युपी वॉरियर्सतर्फे सोफी इक्लेस्टोन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिने 13 धावात 4 तर दीप्ती शर्माने 26 धावात 3, तसेच राजेश्वरी गायकवाडने 26 धावात एक गडी बाद केला. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरच्या डावामध्ये 2 षटकार आणि 16 चौकार नोंदवले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना देविका वैद्य आणि कर्णधार अॅलिसा हिली यांनी 13 षटकात विजयाचे उद्दिष्ट गाठत रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा 7 षटके बाकी ठेवून दहा गड्यांनी दणदणीत पराभव केला. अॅलिसा हिलीने 47 चेंडूत 1 षटकार आणि 18 चौकारासह नाबाद 96 तर देविका वैद्यने 31 चेंडूत 5 चौकारासह नाबाद 36 धावा झळकवल्या. या जोडीने 13 षटकात अभेद्य 139 धावांची शतकी भागीदारी केली. युपी वॉरियर्सचा या स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने या स्पर्धेत आपले चारही सामने गमवले असल्याने त्यांचे या स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. युपी वॉरियर्सच्या डावात 1 षटकार आणि 23 चौकार नोंदवले गेले. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या हिलीने आतापर्यंत सर्वाधिक 96 धावा नोंदवल्या आहेत. यापूर्वी युपी वॉरियर्सच्या ताहिला मॅकग्राने नाबाद 90 धावा झळकवल्या होत्या.
संक्षिप्त धावफलक : रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर 19.3 षटकात सर्वबाद 138 (इलेसी पेरी 52, डिव्हाईन 36, श्रेयांका पाटील 15, बर्न्स 12, इक्लेस्टोन 4-13, दीप्ती शर्मा 3-26, गायकवाड 1-26), युपी वॉरियर्स 13 षटकात बिनबाद 139 (देविका वैद्य नाबाद 36, अॅलिसा हिली नाबाद 96).