34 लाखाची केली मागणी
शालेय विद्यार्थ्यांमध्ये खोडकरपणा भरपूर असतो, परंतु अलिकडेच काही शालेय विद्यार्थ्यांनी तर कहरच केला. त्यांनी स्वत:च्या शाळेला एका रियल इस्टेट वेबसाइटवर विकण्यासाठीच नोंदणीकृत केले. ही घटना अमेरिकेच्या मेरीलँड येथील आहे. फोर्ट माइडेमध्ये माइडे हायस्कूलच्या या विद्यार्थ्यांनी रितसर स्वत:च्या शाळेचा एक-एक तपशील शेअर केला होता.
अभ्यासामुळे त्रस्त या प्रँकस्टर मुलांनी थट्टेच्या स्वरुपात जाहिरात तयार केली. यात त्यांनी शाळेतील त्रुटींवर उपहासात्मक प्रकाश टाकला आहे. शाळेचे एक छायाचित्र शेअर करण्यात आला असून यात येथे कचऱ्याचा एअर फ्रेशनर आहे आणि पाण्याची समस्या आहे असे नमूद केले आहे.
वेबसाइटवर विद्यार्थ्यांनी शाळेची किंमत 42,069 डॉलर्स म्हणजेच सुमारे 34 लाख रुपये इतकी अपेक्षित असल्याचे नमूद केले होते. या विद्यार्थ्यांनी स्वत:च्या शाळेला ‘नाइस हाफ वर्किंग जेल’ असेही संबोधिले, ज्यातील बांधकाम अर्धवट असून ते जीवघेणे ठरू शकते. याचबरोबर अनेक किडे असून ते तुम्हाला त्रास देतील असे यात लिहिले गेले.
या जाहिरातीबद्दल शाळेच्या अधिकाऱ्यांना कळल्यावर त्यांनी नाराजी व्यक्त करण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या थट्टेच्या सुराचे कौतुकच केले. ही जाहिरात अत्यंत क्रिएटिव्ह होती, परंतु ती पोस्ट करणाऱ्यांनी याची अनेक वैशिष्ट्यो असूनही किंमत अत्यंत कमी ठेवल्याने आम्ही चकित झालो आहोत. खरेदी करणारा त्वरित ही शाळा खरेदी करेल असे शाळेचे प्रवक्ते बॉब मोजियर यांनी म्हटले आहे. शाळेने हा प्रकार अत्यंत सकारात्मक पद्धतीने घेतला आहे. परंतु ही जाहिरात आता हटविण्यात आली आहे. येथील हायस्कूल सीनियर्सनी अशाप्रकारचा खोडकरपणा पहिल्यांदाच केलेला नाही.