प्रतिनिधी / पुणे
दहशतवादी कारवायांप्रकरणी एटीएसने अटक केलेल्या चार दहशतवाद्यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाकडून 11 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. संबंधित दहशतवादी ‘इसिस’ आणि ‘अल सुफा’ या बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित असून, देशभरात बॉम्बस्फोट घडविण्याचा त्यांचा कट एटीएसने केलेल्या चौकशीतून उघडकीस आल्याची माहिती सूत्रांकडून शनिवारी देण्यात आली.
दुचाकी चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी (वय 24) आणि मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (वय 23, दोघे रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा, मूळ रतलाम, मध्यप्रदेश) यांना कोथरूड येथे पोलिसांनी अटक केली होती. अधिक तपासात ते एनआयए शोध घेत असलेले दहशतवादी असल्याचे स्पष्ट झाले. या दोघांचा ताबा एटीएसने घेतल्यानंतर संबंधित दहशतवाद्यांनी पुणे, कोल्हापूर आणि सातारा येथील जंगलात बॉम्बस्फोट चाचणी केल्याचे उघडकीस आले. या दोघांना पुण्यातील कोंढवा भागात राहण्यास खोली देणारा अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (वय 32, रा. कोंढवा) याला तसेच आर्थिक मदत करणारा रत्नागिरी येथील मेपॅनिकल इंजिनिअर सिमाब नसऊद्दीन काझी (वय 27) यालाही एटीएसकडून अटक केली. या दहशतवाद्यांनी पुण्यासह काही शहरात घातपाताचा कट आखल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या कटात झुल्फिकार अली बडोदावाला याचाही सहभाग निष्पन्न झाल्यावर त्यालाही एटीएसने ताब्यात घेतले आहे.
झुल्फिकार अली बडोदावाला याने मोहम्मद खान आणि मोहम्मद साकीला पठाण व काझीच्या माध्यमातून दहशतवादी कारवाईसाठी आर्थिक मदत केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एटीएसने त्याला एनआयच्या गुन्ह्यातून वर्ग करून घेतले आहे. इसिसच्या दहशतवादी कारवायांसाठी तऊणांना जाळ्यात ओढण्यात महाराष्ट्रातील गट सक्रिय होता. या प्रकरणी एनआयएच्या पथकाने बडोदावाला याच्या चार साथीदारांना अटक केली होती. त्यांची पोलीस कोठडीची मुदत शनिवारी संपुष्टात आल्यावर त्यांना विशेष अतिरिक्त न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात दहशतवादविरोधी पथकाकडून हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने संबंधित आरोपींना पोलीस कोठडी सुनावली. सरकारी पक्षातर्फे अॅड. विजय फरगडे, तर बचाव पक्षातर्फे अॅड. यशपाल पुरोहित यांनी युक्तिवाद केला.
फरार शाहनवाजचे छायाचित्र जारी
दरम्यान, कोथरूड भागात पकडलेल्या महंमद साकी व महंमद खान या दहशतवाद्यांना बॉम्ब तयार करण्याचे साहित्य उपलब्ध करून देणाऱ्या त्यांच्या फरार साथीदाराच्या शोधासाठी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) देशभरात तपास सुरू केला आहे. देशातील वेगवेगळ्या भागात एटीएसने पथके पाठविली आहेत. मोहम्मद शहनवाज अल सफा (वय 31) असे त्याचे नाव असून, राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) जयपूर बॉम्बस्फोट प्रकरणात फरार घोषित केले आहे. पसार झालेला दहशतवादी शाहनवाज याच्या शोधासाठी अन्य राज्यातील तपास यंत्रणांचीही मदत घेण्यात आली आहे. त्याचा ठावठिकाणा न लागल्याने एटीएसकडून शाहनवाजचे छायाचित्रही प्रसारित करण्यात आले आहे.
डॉ. अदनान अली आणि बडोदावाला नातेवाईक
‘इसिस’ या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या कारवायांमध्ये तऊणांना ओढण्यात महाराष्ट्रातील गट सक्रिय होता. त्याबाबतची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) मिळाल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी मुंबई, ठाणे, तसेच पुण्यातून चौघांना अटक करण्यात आली आहे. मुंबईतून तबिश नासेर सिद्दिकी, पुण्यातील जुबेर नूर मोहम्मद शेख, अबू नुसैबा तसेच ठाण्यातील शरजील शेख व झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक करण्यात आली आहे. एनआयएने गेल्या आठवड्यात पुण्यातील डॉ. अदनान अली सरकार यालाही अटक केली आहे. एटीएसने अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याप्रकरणी बडोदावाला याला नुकतेच मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेण्यात आले. बडोदावाला आणि डॉ. अदनान अली दोघे नातेवाईक असल्याची माहितीही तपासात मिळाली आहे.
जगभरातील दहशतवादी संघटनांचा अतिरेक्यांकडून अभ्यास
एटीएसकडून अटक करण्यात आलेल्या ‘त्या’ चार दहशतवाद्यांच्या चौकशीत नवनवीन माहिती समोर येत आहे. दहशतवादी कारवाया करण्यासाठी संबंधित दहशतवाद्यांनी जगभरातील दहशतवादी संघटनांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केल्याचेही निष्पन्न झाले आहे.
या चौघांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. आता त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत आता 11 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. दरम्यान, साहायक पोलीस आयुक्त अरूण वायकर यांनी न्यायालयात सांगितले की, राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) महाराष्ट्र् मोड्युलप्रकरणी काही जणांना अटक केली. दोन्हीतील आरोपी हे एकमेकांच्या संपर्कात होते. या दहशतवाद्यांनी वेगवेगळी नावे धारण केली होती. त्यांनी बॉम्ब बनविण्याचे प्रात्यक्षिक सोबत मिळून केले. यात अनेकांचा सहभाग असण्याची शक्मयता आहे. महत्त्वाचे म्हणजे अटक करण्यात आलेल्या दशहतवाद्यांचे शिक्षण आणि त्यांना माहिती तंत्रज्ञानाचे असणारे ज्ञान हे जुळणारे नाही. त्यांच्या मागे कोणी तरी मोठे असण्याची शक्मयता आहे.
आधारकार्ड दाखवून वस्तूंची खरेदी
देशात बंदी नसलेल्या मात्र निर्बंध असलेली काही रसायने, संवेदनशील पदार्थांची खरेदी ही दहशतवाद्यांनी केली आहे. अशा प्रकारच्या वस्तू खरेदी करताना आधार कार्ड देणे सक्तीचे असते. या दहशतवाद्यांनी आधारकार्ड दाखवून या वस्तू खरेदी केल्या.
दहशतवाद्यांकडे देशातील काही ठिकाणांचे नकाशे
अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून देशभरातील काही ठिकाणचे काही नकाशे जप्त करण्यात आले आहेत. शनिवारी यातील एक नकाशा न्यायालयात सादर करण्यात आला होता. त्यात देशभरातील कुठल्या ठिकाणी, कुठल्या शहरात घातपात करण्याची तयारी करण्यात येत होती, याची माहिती देण्यात आली होती.