संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करण्याची मागणी
बेळगाव : मजगावात-शहर प्रभाग क्रमांक 58 मध्ये सध्या ठिकठिकाणी पाण्याची डबकी सदृष्य चित्र दिसत आहे. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी प्रशासनाने मजगावला 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी घिसाडघाई करून संपूर्ण गावभर नवीन पाईपलाईन घालण्यात आली आणि ताबडतोब संपूर्ण गावातील रस्त्यांचे डांबरीकरण केले. आता एक दोन वळीव पाऊस झाल्याने पाईपलाईनसाठी खणलेल्या चरी उतरल्याने पूर्वीची पाण्याची नळजोडणीचे पाईप ठिकठिकाणी फुटल्याने मजगावात अनेक ठिकाणी पाणी वाया जात असून ऐन उन्हाळ्यात डबकी पहायला मिळत आहेत. सध्या मजगावला दहा ते बारा दिवसातून नळपाणी पुरवठा महानगरपालिकेतर्फे होत आहे. तोही अपुरा आहे. पाईपलाईन फुटल्याने काही ठिकाणी दूषित पाणीपुरवठाही होत आहे. संबंधीत अधिकाऱ्यांनी पाहणी करून तुटलेले नळ कनेक्शन जोडून वाया जाणारे पाणी वाचवून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.