शेतावर भेट देऊन केली प्रत्यक्ष पाहणी : दुष्काळाची माहिती सरकारला पाठविणार
बेळगाव : पावसाअभावी बेळगाव, खानापूर तालुक्यात झालेल्या पीकहानीची व दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यात आली असून लवकरच यासंबंधी सरकारला विशेष अहवाल सादर करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. बुधवारी बेळगाव व खानापूर तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर उपस्थित होते. भात, सोयाबीन, बटाटा, रताळी, भुईमूग, भाजीपाला आदी पिकांचे नुकसान व चारासमस्येविषयी शेतकऱ्यांकडूनच त्यांनी माहिती जाणून घेतली. बेळगाव तालुक्यातील तारिहाळ येथील रामलिंग भीमाण्णा नायक यांनी तीन एकरमध्ये पिकविलेल्या भातपिकाची हानी झाली आहे. सोमनिंग खणगावकर यांच्या जमिनीतील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. या दोन्ही ठिकाणी भेट देऊन अधिकाऱ्यांनी पाहणी केली. मारुती गौंडवाडकर यांच्या जमिनीतील बटाटा व सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. एकरी 7 ते 8 टन बटाटा उत्पादन होत होते. पावसाअभावी पीकहानी झाली असून उत्पादन नगण्य असणार असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. चंदनहोसूर येथील आण्णाप्पा पाटील यांच्या जमिनीतील कोबीज पिकाचीही अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
सर्वेक्षणासंबंधी सविस्तर माहिती
तत्पूर्वी खानापूर तालुक्यातील पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यात आली. या दोन्ही तालुक्यातील सर्वेक्षणासंबंधी सविस्तर माहिती देण्याची सूचना कृषी व बागायत खात्याच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. कृषी खात्याचे सहसंचालक शिवनगौडा पाटील यांनी या दोन्ही तालुक्यातील पीकहानीसंदर्भात माहिती दिली. बागायत खात्याचे उपसंचालक महांतेश मुरगोड यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली.
विशेष अहवाल सरकारला पाठविणार
पावसाअभावी दोन्ही तालुक्यात चाऱ्याची समस्या निर्माण होणार आहे, अशी माहिती पशुसंगोपन खात्याचे उपसंचालक डॉ. राजीव कुलेर यांनी दिली. बेळगाव तालुक्यात 38 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. तरीही 99 टक्के पेरण्या झाल्या आहेत. खानापूर तालुक्यात 8 टक्के पावसाचा अभाव आहे. या दोन्ही तालुक्यातील नुकसानीसंदर्भात सरकारला विशेष अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी वेगवेगळ्या खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.