पंतप्रधानांच्या स्वागताची तयारी : रंगरंगोटीच्या कामाला वेग : स्वच्छताकाम गतिमान
बेळगाव : बेळगाव रेल्वेस्थानकाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन दि. 27 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी भेट दिली. रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत रेल्वेस्थानकाचा फेरफटका मारत कामाचा आढावा घेतला. रेल्वेस्थानकाचे नुतनीकरण झाले असून, पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या त्यांच्या दौऱ्यामध्ये कोणतीही कमी राहू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी रेल्वेस्थानकातील कामांची पाहणी केली. काही उणिवा असल्याने रेल्वे अधिकाऱ्यांना त्याबाबत सूचना केल्या. रेल्वेस्थानकावर लावण्यात आलेल्या इतिहासाची माहिती अचूक आहे का? याचीही पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
रंगरंगोटीच्या कामाला वेग
उद्घाटन अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने रेल्वेकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. प्लॅटफॉर्मची स्वच्छता करण्यासोबतच रंगकाम केले जात आहे. त्याचबरोबर रेल्वेस्थानकाच्या मुख्य इमारतीवर लावण्यात आलेल्या प्रतिमांची स्वच्छता करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांसोबत पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, मनपा आयुक्त रुद्रेश घाळी, रेल्वे अधिकारी ए. जी. पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते.