सोशल मिडियावर अनेक तऱ्हेचे चित्रविचित्र आणि विस्मयकारक तसेच संभ्रम निर्माण करणारे व्हिडीओज पोस्ट केले जातात, हा अनुभव आहे. अनेक व्हिडीओज आपल्या ज्ञानात भर घालणारे असतात. तर अनेक आपल्या मनात संभ्रम निर्माण करणारेही असतात. अफवा पसरविणे आणि लोकांच्या मनात धाक निर्माण करणे, यासाठीही सोशल मिडियाचा उपयोग बऱ्याच वेळेला करण्यात येतो.
आपल्या कारमध्ये एक गुप्त रेफ्रिजरेटर (फ्रीज) बसवलेला असतो, अशा आशयाचा एक व्हिडीओ अलिकडच्या काळात फिरु लागल्याने लोकांच्या मनात वेगवेगळ्या शंका उपस्थित होण्याची शक्यता आहे. इन्स्टाग्रामवर टाकण्यात आलेल्या या व्हिडीओत एक युवती तिच्या कारमध्ये गुप्तपणे एक फ्रिज बसविला असल्याचा दावा करताना दिसून येते. हा फ्रीज हात ठेवायच्या दांड्याच्या आत (आर्मरेस्ट) बसविण्यात आलेले आहे, असे तिचे म्हणणे आहे.
यामुळे बराच गोंधळ उडाला. फ्रीज बसविण्याचे कारण काय ? फ्रीज बसवायचाच, तर तो गुप्तपणे का ? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाले. मात्र, काही जाणकारांनी याचे योग्य उत्तर दिले. सर्व कार्समध्ये असा फ्रीज नसतो. तसेच ज्या मोजक्या ब्रँडमध्ये तो असतो तो कारमध्ये थंडावा रहावा म्हणून असतो. तो गुप्त नसतो, आदी माहिती त्यांनी दिल्याने अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सोशल मिडियावर अशा बाबी घडत असतात.