पैंगीण पंचायतीची मागणी, ठराव संमत : मुख्यमंत्री, पुरातत्त्वमंत्री, सभापतींना प्रत
काणकोण : गालजीबाग, पैंगीणचे सुपुत्र आणि तेरेखोल वीर म्हणून ओळखले जाणारे ख्रि. आल्फ्रेड आफोंस यांनी 15 ऑगस्ट, 1954 रोजी तेरेखोल किल्ल्यावर 14 सत्याग्रहींना घेऊन सत्याग्रह केला होता. त्या आफोंस यांचा पुतळा तेरेखोल किल्ल्यावर उभारण्यात यावा, असा ठराव पैंगीणच्या पंचायतीने घेतला आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक स्व. श्रीधर पैंगणकर यांचे सुपुत्र असलेले पैंगीणचे उपसरपंच सुनील पैंगणकर यांनी हा ठराव मांडला आणि सरपंच सविता तवडकर यांनी या ठरावाला अनुमोदन दिले. या ठरावाची प्रत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पुरातत्त्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई आणि काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांना पाठविण्यात आली आहे. ख्रि. आल्फ्रेड आफोंस यांनी हातात तिरंगा घेऊन सतत तीन दिवस त्या ठिकाणी सत्याग्रह केला होता. त्यावेळी पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी त्यांना पकडून त्यांचा अमानुष छळ केला होता. मुंबईच्या टेलिफोन कंपनीत काम करणारे आफोंस देशप्रेमापोटी आपल्या पगारी नोकरीचा त्याग करून गोव्याच्या मुक्तीलढ्यात उतरले होते.
आफोंस यांच्या प्रेरणेतूनच 15 ऑगस्ट, 1955 रोजी संपूर्ण भारतातून या किल्ल्यावर सत्याग्रहासाठी आलेल्यांपैकी तुळशीदास बाळकृष्ण हिरवे उर्फ हिरवे गुरुजी आणि शेषनाथ वाडेकर हे दोघे हुतात्मे झाले होते. गोवा सरकार सध्या हिरवे गुरुजी आणि शेषनाथ वाडेकर यांचे पुतळे तेरेखोल किल्ल्यावर उभारण्याच्या विचारात असून त्याच ठिकाणी ख्रि. आल्फ्रेड आफेंस यांचाही पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी पैंगीण पंचायतीने केली आहे. आफोंस यांचे स्मारक ज्या ठिकाणी आहे त्याच जागी त्यांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी या पंचायतीची मागणी आहे. दरम्यान, आल्फ्रेड आफोंस यांचे सुपुत्र वॉल्टर आफोंस यांनीही स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष गुरुदास कुंदे यांना पत्र पाठवून आफोंस यांचा पुतळा उभारण्याची मागणी केली आहे.