348 विमानांतून 1 लाख 40 पर्यटकांचे गोव्यात आगमन, दाबोळी विमानतळावरील व्यवसाय पूर्वपदावर, आर्थिक वर्षात 80 लाख 35 हजार प्रवाशांची हाताळणी
वास्को : दाबोळी विमानतळावर यंदाच्या पर्यटन हंगामात 348 आंतरराष्ट्रीय चार्टर विमानांचे आगमन आणि प्रयाण झाले. या 348 आंतरराष्ट्रीय हवाई जहाजांतून 1 लाख 40 हजार चार्टर पर्यटक गोव्यात उतरले. चार्टर हवाई व्यवसायाबरोबरच कोविड काळात उतरलेला दाबोळी विमानतळावरील देशी विदेशी हवाई व्यवसायही आता पूर्वपदावर आलेला असून यंदा एकूण 80 लाख 35 हजार हवाई प्रवासी दाबोळी विमानतळावर हाताळले गेले आहेत. नुकताच गोव्यातील चार्टर पर्यटक हंगामा संपला. तीन वर्षांच्या खंडानंतर यंदा प्रथमच हा व्यवसायीक हंगाम पूर्वपदावर आला. त्यामुळे काहीसे समाधानाचे वातावरण दाबोळी विमानतळ आणि पर्यटन क्षेत्रात दिसून येते. तीन वर्षांपूर्वी कोविडच्या आगमानानंतर दाबोळी विमानतळावरील कोसळलेला हवाई व्यवसाय आता पूर्वपदावर आलेला आहे. चार्ठर पर्यटकांनीही यंदा चांगला प्रतिसाद दिला. हे पर्यटक आता आपल्या मायदेशी परतले आहेत. रशिया, युके, काझिकिस्तान व इतर देशांतून चार्टर पर्यटक ऑक्टोबरपासून गोव्यात येणे सुरू झाले होते. यंदाच्या पर्यटन हंगामात 348 चार्टर विमानांचे दाबोळी विमानतळावर आगमन झाले. या विमानांतून 1 लाख 40 हजार चार्टर पर्यटन गोव्यात उतरले होते. मात्र, मागच्या वर्षी केवळ 39 चार्टर विमाने गोव्यात दाखल झालेली होती व या विमानांतून केवळ 14 हजार आणि थोडे जास्त पर्यटक गोव्यात उतरले होते. मागच्या वर्षाच्या हंगाम हा कोविडच्या ओसरत्या काळात सुरू झाला होता. कोविडनंतरच्या व्यवसायाची ती सुरवात होती. त्यामुळे वातावरणात कोविडची थोडी धाकधुक पर्यटकांमध्ये होतीच. त्यामुळे मागचा हंगाम यशस्वी झाला नव्हता. यंदा मात्र, हा चार्टर पर्यटक हंगाम यशस्वी झाला. मोठ्या संख्येने चार्टर विमाने आणि पर्यटक लाभले असे मत दाबोळी विमानतळाचे संचालक धनंजय राव यांनी व्यक्त केले.
कोविडपूर्व काळाप्रमाणे हवाई प्रवाशांचा ओघ सुरू
राव यांनी दिलेल्या माहितीनुसार आता दाबोळी विमानतळावरील प्रवासी वाहतुक कोविडपूर्व काळाप्रमाणे सुरळीत झालेली आहे. कोविडपूर्व काळात जसा हवाई वाहतुकीचा ओघ होता तसाच आता ओघ आता सुरू झालेला असून कोविडपूर्व काळाच्या तुलनेत 100 टक्के सुधारण झालेली नसली तरी 99 टक्के व्यवसाय सुरळीत झालेला आहे. यंदा चार्टर पर्यटन हंगामाचेही फलीत झालेले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षांत दाबोळी विमानतळावर 80 लाख 35 हजार हवाई प्रवासी हाताळण्यात आले. मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षांत दाबोळी विमानतळाने 30 लाख 1 हजार अतिरीक्त प्रवासी हाताळले आहेत. मागच्या वर्षी दाबोळी विमानतळाने हाताळलेल्या एकूण हवाई प्रवाशांची संख्या 50 लाख 4 हजार होती. या कमी संख्येलाही कोविडच्या ओसरत्या काळातील भिती हेच कारण होते. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. आता आम्ही कोविडपूर्व काळातील पातळीवर आलेला आहोत. हवाई प्रवाशांना आता कोणत्यानी निर्बंधांना सामोर जावे लागत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात यंदाच्या हंगामापेक्षा अधिक चारर्टर विमाने दाबोळी विमानतळावर उतरतील तसेच देशी विदेशी प्रवाशांची संख्याही वाढेल असा विश्वास धनंजय राव यांनी व्यक्त केला.
मोपा विमानतळामुळे टॅक्सी व्यवसायावर परीणाम- टॅक्सीमेन्स युनियन
दाबोळी विमानतळ संचालकांच्या माहितीचा अंदाज घेतल्यास गोव्यात मोपा येथे सुरू झालेल्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा फारसा परीणाम दाबोळी विमानतळावर झाल्याचे दिसून येत नाही. दाबोळी विमानतळाची स्थिती पूर्वपदावर येत आहे. मात्र, दाबोळी विमानतळावरील युनायटेड टॅक्सीमेन्स युनियनचे सरचिटणी प्रसाद प्रभुगावकर यांच्यामते मोपा विमानतळ सुरू झाल्यापासून टॅक्सी व्यवसायावर परीणाम झालेला आहे. टॅक्सी व्यवसायीकांना पूर्वीसारखे ग्राहक मिळत नाहीत. त्याची अन्य कारणेही असू शकतात. मात्र, मोपातील विमानतळाचा झालेला परीणाम नाकारता येणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.