चव्हाण मळ्यासमोरील घटना : वाहनांचे सहा लाखाचे नुकसान : कारमधील सर्व जखमी कलानगर-इचलकरंजीचे रहिवासी
प्रतिनिधी / निपाणी
निपाणी महामार्गावर गुरुवारी सायंकाळी 5 च्या सुमारास सहा वाहनांचा भीषण अपघात झाला. त्यात दोन कारचा चक्काचूर झाला. तर कारमधील 8 जण जखमी झाले. कारमधील सर्व जखमी कलानगर, इचलकरंजी येथील रहिवासी आहेत. यात कारमधील 4 महिला, 4 पुरुष व 2 बालकांचा समावेश आहे. हर्षदा नरेंद्र लोकरे (वय 24), चालक अविनाश नंदकुमार होगाडे (वय 35), जयवंत केरबा म्हेतर (वय 48), पार्वती जयवंत म्हेतर (वय 42), मानसी जयवंत म्हेतर (वय 22), विजया सुनील सातपुते (वय 23), नरेंद्र किशोर लोकरे (वय 28), गुरुनाथ किशोर लोकरे (वय 24), बालिका विभावरी म्हेतर (वय 7), गौरी गुरुनाथ लोकरे (वय 7, सर्व राहणार कलानगर, इचलकरंजी अशी जखमींची नावे आहेत. जखमींना 1033 रुग्णवाहिकेतून महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी, टेम्पोचा (क्रमांक एमएच 09 एफएल 7519) टायर पंक्चर झाल्याने तो महामार्गावरच कडेला थांबला होता. दरम्यान, आयशर (क्रमांक एमएच 50 0394) हा बेळगावहून कोल्हापूरच्या दिशेने जात होता. दरम्यान, चव्हाण मळ्यासमोर महामार्गावर आल्यानंतर चालकाचे लक्ष विचलित झाल्याने त्याने अचानक ब्रेक मारला. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या कारने समोरच्या वाहनाला जोराची धडक दिली. त्यातच पाठीमागून एमसँड भरून येणाऱ्या डंपरने (क्रमांक के 22 डी 2203) कारला पाठीमागून जोराची धडक दिली. त्याच्या पाठीमागून येणाऱ्या कारने (क्रमांक एमएच 09 सीएल 7333) पुढे जाणाऱ्या फॉर्च्युनर कारला पाठीमागून जोराची धडक दिली. यात फॉर्च्युनर कारच्या पाठीमागील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. या विचित्र अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे अर्धातास खोळंबली होती. या घटनेची माहिती मिळताच अवताडे कंपनीचे निरीक्षक संतराम माळगी, निपाणी शहर पोलीस स्थानकाचे साहाय्यक उपनिरीक्षक विठ्ठल पुजारी, हवालदार सुनीता कांबळे इत्यादींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कारमधील सर्व जखमींना महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून निपाणी शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.