वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
येथे 29 ऑगस्टपासून खेळविल्या जाणाऱया 2022 च्या टेनिस हंगामातील चौथ्या अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेचा ड्रॉ काढण्यात आला. अमेरिकेची माजी टॉप सिडेड महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्सला या स्पर्धेचा ड्रॉ थोडा कठीण असल्याचे जाणवते.
या स्पर्धेसाठी सेरेनाने गेल्या काही दिवसापासून आपल्या सरावावर अधिक भर दिला आहे. सेरेनाने आतापर्यंत 23 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. अमेरिकन खुली ग्रँडस्लॅम स्पर्धा हार्डकोर्टवर खेळविली जात असल्याने पुढील आठवडय़ात सुरू होणाऱया टोरँटो खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत सेरेना सहभागी होत आहे. अमेरिकन टेनिस स्पर्धेपूर्वीची ही शेवटची सरावाची स्पर्धा आहे. अमेरिकन टेनिस स्पर्धेत सेरेनाने पहिल्या फेरीतील सामना जिंकला तर तिची दुसऱया फेरीत गाठ टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती बेन्सिक किंवा बेलारुसच्या माजी टॉप सिडेड अझारेंकाबरोबर पडू शकेल. शुक्रवारी अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेचा ड्रॉ जाहीर करण्यात आला. पोलंडची विद्यमान टॉप सिडेड स्वायटेक, जपानची नाओमी ओसाका तसेच कॅनडाची नवोदित लैला फर्नांडिज यांच्यात प्रामुख्याने जेतेपदासाठी चुरस राहिल. अमेरिकेची सेरेना विल्यम्स पुढील महिन्यात 41 व्या वर्षात पर्दापण करीत आहे. टोरँटो टेनिस स्पर्धा 8 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेनंतर सिनसिनॅटी स्पर्धेत सेरेना सहभागी होणार आहे.