वार्ताहर /सावईवेरे
राज्यात सर्वत्र सुरू असलेल्या मुसळधार पावसात काल रविवारी सकाळी सावईवेरे ते आर्ल-केरी मार्गावरील मुख्य रस्त्यावरील वळणावर भुतखांब येथील रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. सुदैवाने यावेळी वाहन त्या मार्गावर वाहन नव्हते त्यामुळे अनर्थ टळला असला तरी या भागातील रस्त्यालगत असलेली झाडे त्वरीत कापावीत अशी जोरदार मागणी वाहन चालकांनी केली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच त्वरित पुंडई अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन झाडांच्या फांद्या कापून रस्ता वाहतूकीस मोकळा केला. भुतखांब ते आर्ल केरी या सुमारे 200 मिटर अंतराच्या मुख्य रस्त्याच्या एका बाजूस आकेशियाची अनेक झाडे वाकलेली आहे. या भागात वाहनांची वर्दळ असून या भागातून जाताना वाहन चालक आपला जीव मुठीत धरून जातात. अनेकवेळा ही झाडे रस्त्यावर कोसळून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून सुदैवाने आजपर्यत कोणतीही जीवितहानी आजपर्यत झाली नसली तरी कोणताही अनर्थ होण्यापुर्वी वन खात्याने याकडे त्वरित लक्ष घालून झाडे कापावीत, अशी मागणी वाहनचालकांनी तसेच या भागातील नागरिकांनी केली आहे.