ओम्नी चालक गंभीर जखमी
प्रतिनिधी / फोंडा
ओपा रोड जंक्शन, खांडेपार येथे मालवाहू ट्रकने दोन कारगाडय़ांना धडक दिल्याने त्यात गिरीश सावईकर (51 रा. वाळपई) हा ओम्नी चालक गंभीर तर दुसऱया वॅग्नर कारचा चालक किरकोळ जखमी झाला. सोमवारी सायंकाळी हा अपघात झाला.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केए 22 डी 0371 हा कोळसावाहू ट्रक फोंडय़ाहून उसगांवच्या दिशेने निघाला होता. जीए 04 सी 7738 या क्रमांकाची मारुती ओम्नी उसगावहून फोंडय़ाकडे तर जीए 04 ई 2212 या क्रमांकाची वॅग्नर कार ओपाहून वाघुर्मेकडे जात होती. येथील जंक्शनवर ट्रकने आधी वॅग्नरला व नंतर ओम्नी कारला धडक दिली व त्यानंतर रस्त्याच्या बाजूला गेला. त्यात ओम्नीचालक गिरीश सावईकर हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. वॅग्नरचा चालक किरकोळ जखमी झाल्याने त्याच्यावर फोंडा उपजिल्हा इस्पीतळात उपचार करण्यात आले. या मालवाहू ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जादा कोळसा भरण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. याप्रकरणी ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे.