विदेशमंत्री जयशंकर यांच्याकडून कोहलीची स्वाक्षरी असलेली बॅट प्रदान : 10 डाउनिंग स्ट्रीट येथे साजरी केली दिवाळी
वृत्तसंस्था/ लंडन
विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासोबत त्यांच्या शासकीय निवासस्थानी 10 डाउनिंग स्ट्रीटवर दिवाळी साजरी केली आहे. सुनक यांनी जयशंकर आणि त्यांच्या पत्नींना दिवाळीनिमित्त निवासस्थानी आमंत्रित केले होते. यादरम्यान जयशंकर यांनी सुनक यांना विराट कोहलीची स्वाक्षरी असलेली बॅट आणि भगवान गणेशाची मूर्ती प्रदान केली आहे.
दिवाळीदिनी ब्रिटनचे पंतप्रधान सुनक आणि त्यांच्या पत्नी अक्षता यांची भेट घेऊन अत्यंत आनंद झाला. या आमंत्रणासाठी मी त्यांचे आभार मानतो. भारताचे नागरिक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वतीने त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. भारत आणि ब्रिटन द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी कार्यरत असल्याचे उद्गार जयशंकर यांनी काढले आहेत.
दुसरीकडे सुनक यांनी स्वत:च्या निवासस्थानी पत्नी अक्षता आणि दोन्ही मुली अनुष्का तसेच कृष्णा यांच्यासोबत दिवाळी साजरी केली आहे. यादरम्यान पूर्ण कुटुंबाने मिळून 10 डाउनिंग स्ट्रीटला सजविले होते. यानंतर सुनक कुटुंबाने साउथहॅम्पटन येथील एका मंदिरात जात पूजा केली आहे.
ब्रिटनचा पहिला आशियाई पंतप्रधान आणि एक हिंदू म्हणून दिवाळी ब्रिटनच्या वैविध्याचे प्रतीक ठरेल अशी अपेक्षा करतो. दीप प्रज्ज्वलित करताना आम्ही भविष्याकडे अपेक्षापूर्ण नजरेने पाहत आहोत. उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक बदल घडवून आणत अंधकारावर प्रकाशाच्या विजयाचा संदेश मिळवून देण्याचे माझे लक्ष्य आहे असे सुनक यांनी स्वत:च्या दिवाळी संदेशात नमूद केले आहे. जयशंकर यांनी बीएपीएस स्वामीनारायण मंदिरात जात पत्नीसोबत पूजा केली आहे. याचबरोबर लॉर्ड्सच्या क्रिकेट मैदानात आयोजित एका सोहळ्यात ते सामील होणार आहेत. यानंतर लंडनमधील भारतीय दूतावासाकडून आयोजित दिवाळी उत्सवात ते सहभागी होतील.
बदलली आहे भारताची प्रतिमा
ब्रिटनच्या दौऱ्यावर असताना भारतीय समुदायासोबत दिवाळी साजरी करण्याचा आनंद घेता येणार आहे. मोदी सरकार दिवसातील 24 तास काम करत असल्याचे सर्वजण जाणून आहेत. दिवाळीदिनी ऋषी सुनक यांच्यासोबत बैठक करून आलो आहे. ब्रिटन आणि भारत यांच्यातील संबंधांवर चर्चा करण्याची संधी आम्हाला मिळाली. भारताची प्रतिमा किती बदलली आहे याचा पुरावा आता दिसून येत असल्याचे जयशंकर म्हणाले.
भारत-ब्रिटन भागीदारी होतेय मजबूत
भारत आणि ब्रिटनचे द्विपक्षीय संबंध वृद्धींगत होत आहेत असे विदेश मंत्रालयाकडून म्हटले गेले आहे. जयशंकर हे स्वत:च्या 5 दिवसीय दौऱ्यादरम्यान ब्रिटनचे विदेशमंत्री जेम्स क्लेवर्ली आणि अन्य महनीयांची भेट घेणार आहेत. भारत-ब्रिटन व्यापक रणनीतिक भागीदारीची सुरुवात 2021 मध्ये करण्यात आली होती. याच्या अंतर्गत भारत-ब्रिटन कार्ययोजना-2030 वर स्वाक्षरी करण्यात आली होत. याचा उद्देश अनेक क्षेत्रांमध्ये संबंधांचा विस्तार करणे आहे.