जर तुम्ही शांतता असलेल्या ठिकाणी राहू इच्छित असाल तर तुम्हाला एक चांगली संधी आहे. इटलीतील एक सुंदर शहर तुमची वाट पाहत आहे. या शहरात तुम्ही तीन महिन्यांपर्यंत मोफत राहू शकता. तसेच येथे खाण्यापिण्याचा खर्च अत्यंत कमी असून सरकारकडून आणखी अनेक सुविधा देखील मिळणार आहे. इतकी चांगली ऑफर असूनही येथे कुणीच राहू इच्छित नाहीत.
या जागेचे नाव ओलोलाई असून इटलीतील हे सुंदर बेट कधी काळी माणसांनी गजबजून गेलेले हेते. हजारोंच्या संख्येत लोक येथे राहत होते. परंतु आता अत्यंत वेगाने येथील लोक शहरांमध्ये वास्तव्यासाठी जात आहेत. यामुळे येथील लोकसंख्या आता एक हजारापेक्षाही कमी झाली आहे. घरं रिकामी पडली असल्याने शहर घोस्ट टाउन ठरण्याची भीती महापौरांना वाटत आहे. याचमुळे त्यांनी विदेशी नागरिकांना येथे राहण्याची ऑफर दिली आहे. तसेच येथे ओस पडलेल्या घरांच्या विक्रीचाही प्रयत्न त्यांनी केला होता. येथील घरांची किंमत केवळ 80 रुपये निश्चित करण्यात आली होती, तरीही लोकांनी फारसे स्वारस्य दाखविलेले नाही.
लॉस एंजिलिस येथील 39 वर्षीय सॉफ्टवेअर डिझायनर क्लेरीज पार्टिसने येथे तात्पुरत्या स्वरुपात वास्तव्याचा निर्णय घेतला आहे. पार्टिस दीर्घकाळानंतर या शहरात रहायला येणारी पहिली व्यक्ती ठरली आहे. मला नेहमीच गर्दीपासून दूर ठिकाणी काम करण्याची इच्छा होती. याचमुळे या जागेची मी निवड केली. यापूर्वी मी जांजीबार येथे होते, परंतु ओलोलाईमध्ये वास्तव्याची संधी मिळताच मी हा निर्णय घेतल्याचे क्लेरीजने सांगितले.
पर्यटनयुक्त नव्हे तर निसर्ग, ताजी हवा, पर्वत, सुंदर समुद्रकिनाऱ्यांनी वेढलेल्या जागी जाण्याची माझी इच्छा होती. ओलोलाई अत्यंत उत्तम ठिकाण आहे. सार्डिनियाचे हे गाव समुद्र किनाऱ्यापासून दूर जंगलात आहे. येथे लोक आजही अत्यंत जुन्या परंपरांचे पालन करतात असे क्लेरीजने सांगितले आहे.