लोकांसाठी बनले आकर्षण, देखावा पाहण्यासाठी गर्दी
काणकोण : दरवर्षीप्रमाणे यंदा देखील काणकोणच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आकर्षक असे देखावे तयार करण्याची आपली परंपरा कायम ठेवली आहे. वडामळ, श्रीस्थळ येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांचा आकर्षक देखावा बनविला आहे., तर चार रस्ता येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सीता स्वयंवराचा भव्य असा देखावा उभारला आहे. याशिवाय काणकोणच्या पोलीस स्थानकावरील सार्वजनिक गणेशोत्सवातील देखावा सर्वांना आकर्षित करत असून त्यात पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.
हा देखावा पाहण्यासाठी सध्या भाविकांची गर्दी उसळत आहे. काणकोण पोलीस स्थानकाचे निरीक्षक चंद्रकांत गावस यांचे प्रोत्साहन आणि या स्थानकावर असलेल्या स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांचा उत्साह आणि परिश्रम यामुळे हा भव्य देखावा तयार झाल्याचे दिसत आहे. या पोलीस स्थानकावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या घरच्या गणेशोत्सवातील सजावट करण्यासाठी जेवढे परिश्रम घेतले आहेत तेवढेच परिश्रम या देखाव्यासाठीही घेतले आहेत. पोलीस स्थानकाच्या बाजूची सफाई करण्याबरोबर या ठिकाणी केलेली रोषणाई देखील आकर्षक अशीच आहे. विशेष म्हणजे काणकोणातून पंढरपूरला गेलेले वारकरी, त्यांना शुभेच्छा देणारे काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर, माजी आमदार विजय पै खोत, भाजपाच्या मंडळ समितीचे पदाधिकारी व सदस्य, विविध भागांतील पंच, महिला कार्यकर्त्या तसेच पंढरपूर वारीतील छायाचित्रे यांचाही या देखाव्यात समावेश आहे.