आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज
सरकते दरवाजे आणि विस्तीर्ण मार्ग असणारे सुपरमार्केट, व्हिलचेअर्स असलेली शॉपिंग ट्रॉली आणि वॉशरुमच्या दारावर बेल अक्षरे, प्रत्येक मजल्यावर असलेली चिन्हे ही सिंगापूरच्या एका अनोख्या गावाची वैशिष्टय़े आहेत. सिंगापूरमध्ये दिव्यांग नागरिकांना समाजात वावरताना अडचणी येऊ नयेत, त्यांनाही इतरांप्रमाणे सुलभपणे जगता यावे म्हणून तिथल्या सरकारने ही पावले उचलली आहेत. या गावाचे नाव ‘एनेबलिंग व्हिलेज’ असून याला ईव्ही देखील म्हटले जाते. ही सर्वसमावेश आणि संवेदनाक्षम-अनुकूल जागा आहे. येथे दिव्यांग नागरिक एकत्रितपणे आनंदाने जीवन जगू शकतात.
कोणताही दिव्यांग व्यक्ती येथे सहजपणे वावरू शकेल आणि जगण्याचा आनंद घेऊ शकेल अशाप्रकारे या गावाची रचना करण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तींना प्रत्येक काम करताना अगदी सहज वाटाव म्हणून या गावात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
येथील व्यावसायिक दिव्यांग व्यक्तींना नोकरीवर ठेवतात आणि त्यांना कामाचं खशिक्षण देतात. यात हॉटेल्स, जीम यासारख्या व्यवसायांचा समावेश आहे. येथे दिव्यांग व्यक्तींच्या कामाचा सन्मान करण्यात येतो. आमच्या सामूहिक प्रयत्नांतून दिव्यांग व्यक्ती चांगले आणि अर्थपूर्ण जीवन जगतील अशी आम्हाला आशा असल्याचे उद्गार एसजी एनेबलचे मुख्य कार्यकारी अधिकारी कू जियोक बून यांनी काढले आहेत. या गावात दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक प्रशिक्षण, करियर मेळाव्यांचे आयोजन केले जाते. तसेच येथे अनेक रोजगार मेळावेही आयोजित होतात. मुलाखतीच्या टिप्स देण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळाही आयोजित केली जाते. ही जागा विदेशी पर्यटकांनाही आकर्षित करते. हे सक्षम गाव स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही पाहुण्यांना सामावून घेते असे बून म्हणाले.