रुग्णालयातही देखील जात नाहीत लोक
भारत हा वैविध्यपूर्ण देश आहे. येथे अत्यंत अनोख्या प्रकारची गावं आढळून येतात. काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशमधील एक सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या गावाचा स्वत:चा एक कायदा आहे. तर आता एका गावातील लोक पादत्राणेच वापरत नाहीत. एवढेच नाही तर परगावातून आलेल्या लोकांनावरही हा नियम लागू होतो.
आंध्रप्रदेशातील वेमना इंदलू गाव सध्या चर्चेत आले आहे. तिरुपतिपासून 50 किलोमीटर अंतरावरील या गावात एकूण 25 कुटुंबांचे वास्तव्य आहे. गावाची एकूण लोकसंख्या 80 इतकी आहे. गाव अत्यंत छोटे असले तरीही येथील नियम आणि परंपरा अत्यंत अनोख्या आहेत. गावातील बहुतांश लोक अल्पशिक्षित असून बऱ्याचअंशी शेतीवरच अवलंबून आहेत. ग्रामस्थ एखाद्या अधिकाऱ्यापेक्षा स्वत:ची देवता आणि गावप्रमुखाचे म्हणणे मानतात असे बोलले जाते.
येथे पलवेकरी समुदायाशी निगडित लोक राहतात आणि स्वत:ची ओळख ते दोरावारलू अशी करून देतात. आंध्रप्रदेशात या जातीला मागास वर्गाच्या श्रेणीत समाविष्ट करण्यात आले आहे. या गावातील कुणीच कधीच रुग्णालयात जात नाही. आम्ही ज्याची पूजा-प्रार्थना करतो तो आम्हाला सांभाळेल असे या लोकांचे मानणे आहे. या गावातील लोक अन्य ठिकाणच्या मंदिरात जात नाहीत, तर गावातील एका मंदिरातच पूजा करतात. गावातील कुणी आजारी पडल्यास तो या मंदिर परिसरातील एका वृक्षाला प्रदक्षिणा घालतात, आजाराची तीव्रता कितीही असली तरीही लोक रुग्णालयात जता नाहीत.
या गावातील नियम अत्यंत कठोरपणे पाळले जातात. या गावात बाहेरून कुणी येत असल्यास त्याला स्वत:चे चप्पल गावाबाहेर काढूनच आत प्रवेश करावा लागतो. येथे येणाऱ्या अधिकाऱ्यांनाही या नियमाचे पालन करावे लागते. गावातील कुणी व्यक्ती बाहेर गेल्यास त्याला स्नान केल्याशिवाय गावात पुन्हा प्रवेश मिळत नाही. तसेच मासिक पाळीदरम्यान महिलांना गावाबाहेर रहावे लागते. त्या कालावधीत त्यांना सर्व आवश्यक गोष्टी पुरविल्या जातात.
या गावातील मुले आता शाळेत शिकत असली तरीही ती मध्यान्ह आहाराचा स्वीकार करत नाहीत. या गावातील लोक घराबाहेरच्या अन्नाला स्पर्शही करत नाहीत. या गावात एखाद्याचा नातेवाईक दाखल झाल्यास त्यालाही सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागते. तसेच या गावातील लोक बाहेरचे पाणी देखील पित नाहीत. परगावी गेल्यास ते स्वत:सोबत पाणी अन् जेवण घेऊन जात असतात.