अध्याय अठ्ठाविसावा
भगवंत म्हणाले, सिद्धींचे विघ्न योगाभ्यास करणाऱ्या साधकाच्या वाटेत उभे राहून त्याचा कैवल्यसाक्षात्काराचा मार्ग अडवत असतात. अशावेळी स्वप्रयत्नाने त्यांच्या उपभोगांचा मोह टाळावा असे साधकाला कितीही वाटत असले तरी समाधीतून बाहेर आल्यावर त्याची देहबुद्धी जागृत होत असल्याने त्याला सिद्धींच्या उपभोगांचा मोह टाळू म्हणता टाळता येत नाही.
अशावेळी त्याने अनन्य भावाने माझी भक्ती करावी. मला अनन्य भावाने शरण येताना त्याने त्यांची मन आणि बुद्धी मला अर्पण केलेली असल्याने माझ्याखेरीज इतर कुणाचे अस्तित्वच त्याला मान्य होत नाही. यात त्याच्या स्वत:च्या अस्तित्वाचासुद्धा समावेश होत असल्याने त्याची देहबुद्धी नष्ट होते. त्यामुळे देहबुद्धीच्या उपस्थितीने त्याच्यावर ओढवलेले सिद्धींचे विघ्न नाहीसे होते. जेव्हा जेव्हा भक्त मला साकडे घालतात त्या त्या वेळी त्यांना होणारा त्रास मी स्वत: सोसतो आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना कसलीही झळ बसू देत नाही. माझ्या अनन्य भक्तांची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर असल्याने वेळोवेळी मी भक्तांच्या मदतीला धावून जाऊन त्यांचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या आजूबाजूलाच फिरत असतो. असे असताना माझ्या भक्तांवर विघ्न आणून त्यांना त्रास देण्याची कुणाचीच हिम्मत होत नाही.
जे भक्तिभावाने माझी भक्ती करतात त्या साधकांना स्वसुखाची प्राप्ती होते. त्या स्वसुखात ते नाहून निघाल्यामुळे त्यांच्यातील कामक्रोधादि षड्रिपू नाहीसे होतात. उद्धव भगवंतांचे बोलणे मन लाऊन ऐकत होता. त्याच्या मनात असा प्रश्न आला की, भगवंत सांगतायत त्या स्वसुखाची प्राप्ती साधकाला मृत्युसमयी प्राप्त होते की ती त्याला आधीच प्राप्त होते? मनात आलेला प्रश्न त्याने भगवंताना विचारला. उत्तरादाखल भगवंत म्हणाले, देहान्तानंतर निजसुखाची प्राप्ती होईल असे तुला कदाचित वाटत असेल तर तसे नाही. अरे ही माझी चौथी भक्ती आहे ना, तिची परिस्थिती वेगळीच असते. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी असे भक्तांचे चार प्रकार मी भगवद्गीतेत सांगितले आहेत. पहिल्या तीन प्रकारे माझी भक्ती करणारे भक्त आणि मी ह्यांच्यात द्वैत असते. माझ्या चौथ्या भक्ताची तशी परिस्थिती नसते. ज्ञानी भक्त आत्मज्ञानाने परिपूर्ण झालेला असल्याने तो माझ्याशी एकरूप झालेला असतो. अशा ज्ञानी भक्ताचा देह सुखरूप असतानाच त्याला निजसुखाची प्राप्ती होते. तो देहात असला तरी जीवनातल्या सुख दु:खामुळे अजिबात विचलित होत नाही तो देही असला तरी विदेही अवस्थेत असतो. माझ्याशी एकरूप झालेला असल्याने, देह प्रारब्धावर टाकण्याची कला त्याला साध्य झालेली असते. त्यामुळे जीवनात भौतिक, लौकिक सुख असुदे अथवा नसुदे त्याच्या आध्यात्मिक सुखात कोणतीच कमतरता नसते. त्यामुळे तो सुखाने न्हात असतो. अशा भक्ताचा जीवनप्रवास त्याच्या प्रारब्धानुसार चालू असतो. ज्याप्रमाणे एखादे वाळलेले आणि झाडापासून सुटे झालेले पान
वाऱ्याबरोबर हेलकावे खात कुठेही जात असते त्याप्रमाणे प्रारब्ध नेईल तिकडे त्याचा देह जात असतो. अशा प्रारब्धाच्या हवाली केलेल्या देहात तो असो अथवा नसो त्याला काहीच फरक पडत नाही. माझ्याशी अनन्य झालेला ज्ञानी भक्त तुला देहात वावरताना दिसेल परंतु तो ज्या हलचाली करत असतो त्या तो स्वत:हून करत नसतो. असे का म्हणशील तर मी स्वत: त्यांच्या देहाचा ताबा घेतलेला असतो. येथे एक गंमत असते. ती अशी की, भक्त आणि मी, आम्ही दोघांनी आपापल्या स्थानांची अदलाबदल केलेली असते. भक्त स्वत:चा देह सोडून माझ्या हृदयात रहात असतो तर मी त्याच्या देहात वावरत असतो. असे आम्ही दोघे निजसुखाच्या माजघरी रहात असतो. वरवर दिसायला मी देव आणि तो भक्त आहे आणि आम्ही दोघे वेगवेगळे आहोत असं लोकांना दिसत असतं! पण प्रत्यक्षात ज्ञानी भक्त आणि मी वेगवेगळे आहोत असं कधीही शक्य होत नाही.
क्रमश: