कोरोना काळात गमाविला जॉब, मोठे ब्रँड्स देत आहेत मोठी रक्कम
लॉरेन फ्लायमॅन नावाच्या एका महिलेने स्वतःच्या अजब व्यवसायाद्वारे लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. 30 वर्षीय लॉरेन फ्लायमॅन केवळ दोरीवरील उडय़ा घेत मोठी रक्कम कमावत आहे. तिच्या या छंदामुळे अनेक मोठे बँड्स तिच्यासोबत काम करण्याची ऑफर देत आहेत.
30 वर्षीय लॉरेन फ्लायमॅनला सोशल मीडियावर लोक लॉरेन जम्प्स या नावाने ओळखतात. लॉरेन स्वतःच्या दोरीवरील उडय़ांच्या छंदामुळे सोशल मीडियावर अत्यंत लोकप्रिय आहे. तिला लाखो लोक सोशल मीडियावर फॉलो करतात.
नोकरी सुटल्यावर…..
लॉरेन पूर्वी एका सेल्स कंपनीत काम करायची. 2020 मध्ये पहिल्या लॉकडाउनदरम्यान अचानक तिला कामावरून कमी करण्यात आल्याने ती बेरोजगार झाली. यामुळे तिचा बहुतांश वेळ घरात जाऊ लागला. ती घरातील जिममध्ये वेळ घालवू लागली. स्वतःला व्यग्र ठेवण्यासाठी तिने दोरउडय़ा घेत तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न चालविला. दोरीवरील उडय़ांचे प्रमाण तिने वाढविल्याने ती यात तरबेज झाली आणि वेगवेगळय़ा प्रकारे दोरीवरील उडय़ा घेण्यास तिने सुरुवात केली.
मोठय़ा ब्रँड्सोबत करतेय काम
लॉरेन स्वतःच्या सोशल मीडिया अकौंटवर दरदिनी अनोखे व्हिडिओ शेअर करते. तिच्या व्हिडिओंना मोठी पसंती मिळत असते. तिचे व्हिडिओ अत्यंत लोकप्रिय झाले असून अनेक ब्रँड्सनी स्वतःच्या उत्पादनांसाठी तिच्याशी संपर्क करण्यास सुरुवात केली आहे. डायट ब्रँड, स्पोर्ट्स वियर ब्रँडस एवढेच नव्हे तर आदिदास कंपनीने देखील तिच्यासोबत टाय-अप केले आहे. लॉरेन त्यांच्या उत्पदनांचे प्रमोशन करते.