कब्रला भेट देत जमा करते रेसिपी
जगात अनेक प्रकारचे लोक असून त्यांचे स्वतःचे असे छंद आहेत. कुणाला काही तरी संग्रहित करण्याचा छंद असतो. परंतु काही लोकांचे छंद अत्यंत विचित्र असल्याने ते ऐकल्यावर समोरच्या व्यक्तीला धक्काच बसत असतो. एक असाच छंद अमेरिकेतील एका महिलेला आहे. ही महिला कब्रांवर लावण्यात आलेले टॉम्बस्टोन वाचते आणि स्वतःसाठी नोट्स तयार करते.
काही जणांना दफनभूमींमध्ये पर्यटनस्थळाप्रमाणे फिरण्याचा छंद असतो, परंतु अमेरिकेतील ही महिला लोकांच्या कब्रांमधून खाद्यपदार्थांची रेसिपी मिळविते आणि मग घरी जाऊन ते खाद्यपदार्थ तयार करते. अशाप्रकारे मी जगाचा निरोप घेतलेल्या लोकांच्या जीवनाला सेलिब्रेट करत असल्याचे या महिलेचे म्हणणे आहे.
लायब्ररी सायन्सची विद्यार्थिनी राहिलेली रोजी ग्रांटने सुमारे वर्षभरापासून हा छंद जोपासला आहे. ती काँग्रेसशनल सिमेटरीच्या आर्काइव्हस पहायला गेली होती, तेथेच तिला पहिली ग्रेव्हयार्ड कुकिंग रेसिपी मिळाली. ही रेसिपी स्प्रिट्ज कुकीजची होती, ज्यात केवळ 7 गोष्टींचा वापर करण्यात आला होता. हा खाद्यपदार्थ तयार केल्यावर रोजी अशाप्रकारच्या रेसिपी शोधू लागली. असे खाद्यपदार्थ मला मृत्यूकडे वेगळय़ा दृष्टीकोनातून पाहण्यास भाग पाडत असल्याचे तिचे म्हणणे आहे. तिने आता याच्याशी निगडित टिकटॉक व्हिडिओ तयार केला. यामुळे तिची ग्रेव्हस्टोन रेसिपी व्हायरल झाली.
रोजी दफनभूमीला भेट देत खाद्यपदार्थांची माहिती मिळविते. तिला एका टॉम्बस्टोनावर चॉकलेट फजची रेसिपी मिळाली. मृत्युमुखी पडलेल्या महिलेला या रेसिपीचा खाद्यपदार्थ तयार करून लोकांना खायला देणे आवडायचे असे टॉम्बस्टोनवर नमूद होते. रोजीने आतापर्यंत अशा 12-13 रेसिपीज तयार केल्या आहेत. याचमुळे सोशल मीडियावर तिचे फॉलोअर्स वाढले आहेत. आत्म्यांबद्दल आदर क्यक्त करण्याची रोजी हिची ही पद्धत आहे.