रायगड प्रतिनिधी
किल्ले रायगड परिसरामध्ये रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला, या पावसामध्ये रायगड किल्ला पाहून पायऱ्या उतरत असणाऱ्या तरुणावर दगड पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. हा तरुण हा पुणे येथून शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आला होता. मयत तरुणाचे नाव प्रशांत गुंड (वय २८) असे आहे.
रविवारी सायंकाळी किल्ले रायगड परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. या वादळी पावसामुळे शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्त उभे केलेले तात्पुरते निवारा शेड स्वच्छतागृह तसेच नियंत्रण कक्ष, तंबू इत्यादी साहित्य हवेत उडून गेले. याच दरम्यान किल्ले रायगड उतरत असणाऱ्या एका तरुणावर वरून घरंगळत आलेल्या दरडीतील एक दगड अंगावर कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला.मयत तरुण हा पुणे येथून आला होता.
मयत प्रशांत गुंड व त्याचा मित्र असे दोघेजण शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आले होते. आज रायगड पाहून झाल्यानंतर सायंकाळी ४ च्या सुमारास दोघांनी किल्ले रायगड उतरण्यास सुरुवात केली. महादरवाजा सोडल्यानंतर असलेल्या सपाट मार्गावर एका बाजूला खोल दरी आणि एकीकडे उंच कडा असल्याने पावसात उंच कड्यावरून दरड कोसळली. यामुळे पायी चालणारे प्रवाशांची पळापळ झाली. मात्र प्रशांत याच्यावर या दगडीने घाला घातला. त्याचा मित्र दरड कोसळणे थांबल्यानंतर पुढे गेला असता त्याला प्रशांत याची बॅग दिसून आली. आणि त्यानंतर प्रशांत हा या दरडी खाली सापडल्याचे दिसून आले.
या घटनेची माहिती मिळताच महाड तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील औसरमल, यांच्यासह अन्य पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेवून मयत प्रशांत गुंड याचा मृतदेह महान ग्रामीण रुग्णालयात आणला.