पाली-पाथरट उभी धोंड येथील घटना
वार्ताहर/ पाली
मुंबई-गोवा महामार्गावरील पाली पाथरट उभी धोंड येथे शनिवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली.
पाली पोलीस दूरक्षेत्रातून मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप प्रभाकर धाडवे (25, रा. पाथरट, पाली) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील पाली उभी धोंड येथे 14 जानेवारी रोजी सायंकाळी 7.30 च्या सुमारास दुचाकीला (क्र. एम.एच. 08 एक्स 7522) अपघात होऊन त्यात दुचाकीस्वार प्रदीप धाडवे हा मृत झाला. हा अपघात एवढा मोठा होता की, धाडवे हा जागीच ठार झाला. या अपघाताची माहिती मिळताच पाली पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष कांबळे, पोलीस नाईक राकेश तटकरी यांनी घटनास्थळी दाखल होऊन महामार्गावर काही काळ विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली.
धाडवे याच्या मृतदेहावर पाली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रदीप याच्या अपघाती मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या अपघाताची खबर अनिल धाडवे यांनी दिली. या अपघाताची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत पाली पोलीस दूरक्षेत्र येथे करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे हे करीत आहेत.
महामार्गावर चौपदरीकरण कामामुळे रस्त्यावर खड्डे व माती असल्याने वारंवार अपघात घडत आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व महामार्गाचे कंत्राटदार हे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वाहनचालकांमधून करण्यात येत आहे.