पुणे / वार्ताहर :
पुण्याच्या हडपसर परिसरात कोयताधारी अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने धिंगाणा घालत एका तरुणावर वार करून त्यास जखमी केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी सात अल्पवयीन मुलांसह एकूण आठ जणांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिलिंद मधुकर कांबळे (वय 23) या तरुणाने आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आदित्य राम खैरे (वय 19, रा. हडपसर, पुणे) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मिलिंद कांबळे हे त्याचे मित्र विकी हनुमंत गायकवाड व शुभम धर्मराज चाबुकस्वार यांच्यासोबत म्हाडा कॉलनी येथील पार्किंगमध्ये गप्पा मारत बसले होते. त्यावेळी एका 17 वर्षाच्या आरोपींनी तक्रारदार यांचा मित्र विकी गायकवाड यांच्यासोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्याला साथीदारांसह शिवीगाळ करून लाथा बुक्क्याने मारहाण केली. तसेच जीवे ठार मारण्याचे उद्देशाने तक्रारदार यांच्या डोक्यात धारदार कोयतेने वार करून जखमी केले. तर दुसऱ्या एका 17 वर्षाच्या आरोपीने डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून आणि त्याच्या साथीदारांनी पाठीत धारदार शस्त्रांनी वार करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सात अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत एकाला अटक केली. याबाबत हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस पाटील पुढील तपास करत आहेत.