नवीन मतदार यादीत मतदाराची नाव नोंदणी करण्यासाठी जनजागृतीची नितांत आवश्यकता
अरुण टुमरी /काकती
बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा निवडणूक मतदान अधिकारी यांच्यावतीने मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडण्याचे अभियान पुरेशा जागृतीअभावी संथ गतीने चालू आहे. मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्याचे महत्त्व आणि नवीन मतदार यादीत नाव नोंदणीसाठी जणजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्हय़ात दि. 1 ऑगस्टपासून मतदार ओळखपत्र आधारकार्डशी लिंक करण्याचे अभियान सुरू असून ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन आधार कार्डचा क्रमांक घेऊन लिंक करीत आहेत. मात्र ग्रामीण भागात मतदारांना पुरेशी जाणीव नसल्याने अंगणवाडी सेविकांना लिंक नोंद करण्यासाठी पुन्हा हेलपाटे घालावे लागत आहेत. नवीन मतदार यादीत नाव नोंदणी करुन ओळखपत्र तयार करण्यासाठी 1 ऑक्टोबर 2022 रोजी 18 वर्ष पूर्ण झालेल्या युवक-युवतींनी नवीन मतदार नोंदणी करावी, अशी माहिती राज्य मुख्य निवडणूक अधिकारी मनोजकुमार मीना यांनी दिली. मात्र या संदर्भात अंगणवाडी सेविकांना ग्रामलेखाधिकाऱयांकडून माहिती मिळाली नाही.
अंगणवाडी सेविकांची लिंक करण्यासाठी पराकाष्टा
ग्रामीण भागात ग्रामलेखाधिकारी (तलाठी) अंगणवाडी सेविकांना घरोघरी जाऊन आधार लिंक करण्याचे सांगत आहेत. मात्र 18 वर्ष पूर्ण झालेल्यांना नवीन मतदार नोंदणीबाबत व्यवस्थित माहिती देत नसल्याचे काही अंगणवाडी सेविकांकडून सांगण्यात येत आहे.
ग्रामीण भागात किमान एक हजार लोकसंख्येमागे अंगणवाडी आहे.
महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासावरील सेवा देणे, बाळ जन्मल्यापासून दक्षता घेणे, 3 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणे, माता-बालक यांचे आरोग्य, आहार, कुपोषण या अन्य बाबींकडे लक्ष पुरविणे अशी सारी कामे करुन वेळ काढून मतदार ओळखपत्र लिंक करण्यासाठी पराकाष्टा करावी लागत आहे.
आधार लिंक करण्याचे महत्त्व
बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्राना आधार लिंक करण्याचे अभियान राबविले आहे. यापूर्वी एकाच नावाची व्यक्ती दोन-तीन वेळा मतदान करीत असे आता आधारकार्डशी लिंक केल्यामुळे बनावट मतदानाला चाप बसणार आहे. प्रत्येक मतदाराने जवळच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधून लिंक करुन घेणे आवश्यक आहे.
राज्यात 2023 मध्ये विधानसभा, जिल्हा पंचायत, तालुका पंचायत निवडणुका होणार आहेत. तर 2024 मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी आधार लिंकचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे.