स्टिंग ऑपरेशनद्वारे भाजपचा दावा ः महिलेकडून मागितले 80 लाख
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपने सोमवारी एक स्टिंग ऑपरेशन समोर आणले आहे. आप नेते निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठी प्रत्येकाकडून 80 लाख रुपये मागत असल्याचा दावा भाजपने केला आहे. दिल्लीतील एका प्रभागाचे तिकीट देण्यासाठी आप नेत्याने महिला नेत्या बिंदू यांच्याकडे रक्कम मागितल्याचा आरोप भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे.
पात्रा यांनी दोन व्हिडिओ दाखविले असून यात बिंदू यांच्याकडे आप नेता उमेदवारीसाठी पैशांची मागणी करताना दिसून येतो. आप नेते आर.आर. पठानिया हे या व्हिडिओत दिसून येत आहेत. दोन दिवसांपूर्वीच भाजपने आप नेते आणि राज्याचे मंत्री सत्येंद्र जैन यांचा तिहार तुरुंगात मसाज करवून घेतानाचा व्हिडिओ जारी केला होता.
आप नेते पठानिया हे उमेदवारी ही केवळ पैशांद्वारेच मिळत असल्याचे सांगताना यात दिसून येत आहेत. तसेच संभाषणात ते आप नेते गोपाल राय, सौरभ भारद्वाज, राखी बिर्ला यांचा उल्लेख करत आहेत. आम आदमी पक्ष उमेदवारीची विक्री करून पैसे उकळत असल्याचा आरोप पात्रा यांनी केला आहे.
मागील आठवडय़ात भाजपने आप नेते मुकेश गोयल यांचा एक स्टिंग व्हिडिओ जारी केला होता. मुकेश यांनी एका कनिष्ठ अभियंत्याकडून (ज्युनियर इंजिनियर) एक कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुकेश गोयल हे केजरीवालांचे निकटवर्तीय आहेत. तर मुकेश यांनी स्वतःवरील आरोप फेटाळले होते.
केजरीवालांनी भाजपच्या स्टिंग ऑपरेशनवर प्रतिक्रिया दिली आहे. भाजप नेते दररोज नवा ड्रामा करत आहेत. दिल्लीत मद्यघोटाळा झाल्याने त्यांनी प्रथम म्हटले, मग बस घोटाळा झाल्याचा दावा केला. भाजपने केलेले सर्व आरोप पूर्णपणे खोटे आहेत. आरोपांची चौकशी केल्यास यातून काहीच निष्पन्न होणार असल्याचा दावा केजरीवालांनी केला आहे.
स्टिंग व्हिडिओत दिसून येणाऱया व्यक्तीचा आम आदमी पक्षाशी कुठलाच संबंध नाही. दिल्लीत भाजपने खरोखरच काम केले असते तर अशाप्रकारचे बनावट व्हिडिओ तयार करावे लागले नसते असे विधान आप नेते दिलीप पांडे यांनी केले आहे.