निविदेमध्ये हिंदवाडी येथील ‘त्या’ जागेचा उल्लेख
बेळगाव : महानगरपालिकेची लिलाव प्रक्रिया म्हणजे मागील पानावरून पुढे असाच अनुभव गुरुवारी साऱ्यांना आला. हिंदवाडी येथील एका जागेचा भाडेकरार संपला आहे. त्याठिकाणी कुटुंब नियोजन दवाखाना सुरू आहे. मात्र तीच इमारत लिलाव करण्यासाठी महापालिकेने निविदा दिल्याचे आढळून आले. त्यामुळे नेमका हा प्रकार काय? याबाबत जोरदार चर्चा सुरू होती. महापालिकेची जागा असली तरी मूळ भाडेकरूकडून ती जागा घेऊन आरोग्य विभागाला देण्यात आली आहे. त्याठिकाणी मोफत कुटुंब शस्त्रक्रिया केली जाते. मात्र त्या इमारतीचा आणि जागेचाही उल्लेख या निविदेमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे त्या दवाखान्याचाच लिलाव करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. लिलाव प्रक्रिया राबविताना अनेक चुका करण्यात आल्या आहेत. नेमका गाळा किंवा इमारत कोठे आहे? याची माहितीच अधिकाऱ्यांना आहे की नाही, अशी शंकाही व्यक्त होत आहे.
गुरुवारी 7 गाळ्यांचा लिलाव असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामध्ये हिंदवाडी येथील 8 हजार 21 चौरस फूट जागा, तसेच इमारत लिलाव करण्याबाबतही नोंद करण्यात आली होती. या जागेबाबत काहीजणांना माहिती होती. त्यामुळे लिलावात भाग घेणाऱ्यांनी त्याठिकाणी कौटुंबिक शस्त्रक्रिया करण्याचा दवाखाना असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे अनेक अधिकारीही चक्रावले. त्यानंतर ती लिलाव प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. एकूणच या लिलाव प्रक्रियेमध्ये सावळा गोंधळ असल्याचे चित्र दिसून आले.