दिल्ली येथील युनेस्कोच्या छायाचित्र प्रदर्शनात 25 देशातून 40 छायाचित्रकारांचा सहभाग
प्रतिनिधी/कोल्हापूर
नवी दिल्ली येथील ‘युनेस्को’च्या वतीने जागतिक साक्षरता दिनानिमित्त राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील पहिल्या गटात कोल्हापुरचे सुपुत्र अभिजीत गुर्जर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तृतीय गटात तृतीय आणि विशेष उत्तेजनार्थ असे तीन पुरस्कार पटकावले आहेत. ही सर्व पुरस्कारप्राफ्त छायाचित्रे युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय विशेषांकमध्ये प्रसिध्द केली जाणार आहेत.
अभिजीत गुर्जर यांनी ऊसतोड कामगारांची मुल प्रतिकुल परिस्थितीत कशा पध्दतीने अभ्यास करतात, यासंदर्भातील छायाचित्र काढले होते. या छायाचित्राला प्रथम क्रमांक मिळाला असून, हे छायाचित्र 2018 मध्ये कसबा बावडा येथील राजाराम कारखान्याच्या परिसरात टिपले आहे. या निकालाबाबतची माहिती अभिजीत गुर्जर यांच्या संकेतस्थळावर उपलब्धत आहे. गुर्जर हे शिवाजी विद्यापीठातील जर्नालिझम विभागात फोटो जर्नालिझम या विषयाचे अध्यापन करतात. यापुर्वी त्यांनी महापूर, आशा कर्मचारी, जमिनीची धूप, आदी विषयांवर उत्कृष्ट फोटो जर्नालिझम केले आहे. दिल्लीतील या प्रदर्शनात 25 देशातून 40 छायाचित्रकारांनी सहभाग नोंदवला होता. कोल्हापुरच्या कलेचा वारसा अभिजीत यांनी आपल्या छायाचित्राच्या माध्यमातून युनेस्कोपर्यंत पोहचवला आहे. त्यामुळे त्यांच्या या यशाबद्दल शिक्षण, कला क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.