अभिषेक बच्चनचा आगामी चित्रपट ‘घूमर’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट एक स्पोर्ट्स ड्रामा असून यातील अभिषेक बच्चनची भूमिका अत्यंत प्रभावी आहे. घूमरचा काही मिनिटांचा ट्रेलर चित्रपटासाठीची उत्सुकता वाढविणारा आहे. घूमरमध्ये अभिषेकसोबत सैयामी खेर मुख्य भूमिकेत आहे. दोघेही यात क्रिकेटपटूची भूमिका साकारत आहेत. सैयामीन अनिका नावाच्या महिला क्रिकेटपटूच्या तर अभिषेक बच्चन प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. अनिका ही क्रिकेटप्रेमी आणि देशासाठी खेळू इच्छिणारी युवती आहे. तिला भारतीय महिला क्रिकेट संघात सामील होण्याची संधी मिळते, परंतु तिच्यासोबत एक दुर्घटना घडते, ज्यामुळे क्रिकेट खेळणे दूरच तिला जगणेही नकोसे वाटू लागत असते. तिला स्वत:चा उजवा हात गमवावा लागलेला असतो. स्वत:चे सर्वकाही गमाविलेल्या अनिकासमोर एक प्रशिक्षक (अभिषेक बच्चन) येतो आणि तो तिला यातून बाहेर पडण्यास मदत करत असल्याचे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. या चित्रपटात शबाना आझमी आणि अंगद बेदी हे कलाकारही दिसून येणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन आर. बाल्की यांनी केले आहे. घूमर हा चित्रपट 18 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.