1 हजार जणांची करणार भरती : नव्याने हवाई क्षेत्रात दाखल झालेली कंपनी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतात नव्याने दाखल झालेली अकासा एअर कंपनी येत्या काळात भारतामध्ये 1000 जणांना नोकरी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मार्च 2024 पर्यंत आपल्या सेवेचा विस्तार केला जाणार असून याकरिता वरील अतिरिक्त कर्मचाऱ्यांची भरती कंपनीत विविध पदांवर केली जाणार आहे. कंपनीचे सीईओ विनय दुबे यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
सध्या 2 हजार कर्मचारी
मार्च 2024 पर्यंत कंपनीमध्ये एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 3000 पर्यंत पोहोचणार आहे. यामध्ये 1100 पायलट आणि फ्लाईट असिस्टंट अटेंडंटस् यांचा समावेश असणार आहे. सध्या एअरलाईन कंपनीत 2000 कर्मचारी सेवेत आहेत. सात महिन्याआधी सदरच्या हवाई कंपनीची सुरुवात झाली होती. शेअरबाजारातील दिग्गज गुंतवणूकदार दिवंगत राकेश झुनझुनवाला यांचा कंपनीत 46 टक्के इतका हिस्सा आहे.
क्दरदिवशी विमानफेऱ्या वाढवणार
पुढच्या आर्थिक वर्षापर्यंत आपल्या ताफ्यामध्ये 28 विमानांची भर घालण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्याला दरदिवशी 110 विमानांच्या फेऱ्या होत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. उन्हाळाच्या अखेरपर्यंत दरदिवशी विमानांच्या फेऱ्यांची संख्या 150 वर नेली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काय म्हणाले सीईओ?
सीईओ विनय दुबे म्हणाले, 2023 च्या अखेरपर्यंत नव्या विमानांचा समावेश कंपनीत केला जाणार आहे. त्याकरिता ऑर्डर देण्याची कारवाई लवकरच केली जाईल. कंपनीने याआधी 72 बोईंग 737 मॅक्स विमाने ऑर्डर केली आहेत. यातील 19 विमाने कार्यरत आहेत. विसावे विमान पुढील महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये कंपनीत सामील होणार आहे.