जीर्ण इमारतीची भिंत कोसळली : भाविकांमध्ये घबराटीचे वातावरण
वृत्तसंस्था / मथुरा
मथुरेतील तीर्थक्षेत्र असलेल्या वृंदावन येथील श्री बांके बिहारी मंदिराजवळ रविवारी पहाटे पुन्हा एकदा जीर्ण इमारतीची भिंत कोसळली. ही इमारत श्रावणकुमार खेमका यांची असल्याचे सांगितले जाते. भिंत कोसळण्याची दुर्घटना घडतेवेळी बांके बिहारी मंदिराचे दरवाजे बंद असल्यामुळे आजूबाजूला फारशी गर्दी नसल्याने जीवितहानी टळली आहे.
बांके बिहारी मंदिरात जाण्यासाठी रस्ता क्रमांक एक जुगलघाट मार्गे अनेक भाविक जात असतात. या मार्गावरच भिंत कोसळल्यामुळे रस्ता बंद झाला होता. संततधार पावसामुळे ही दुर्घटना घडल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. भिंत कोसळलेली इमारत गेल्या अनेक दिवसांपासून रिकामी होती. पूर्वी या इमारतीत गोठ्याची व्यवस्था होती.
गेल्या महिन्यात 15 ऑगस्ट रोजी येथे एक मोठी दुर्घटना घडली होती. जीर्ण इमारतीचे छत कोसळल्यामुळे ढिगाऱ्याखाली सापडून पाच भाविकांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी झाले. त्यावेळीही मोडकळीस आलेली घरे पाडण्याचा मुद्दा उपस्थित केला होता, मात्र आजतागायत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यानंतर रविवारी पुन्हा एका घराची भिंत कोसळल्यामुळे मंदिराकडे जाणारा एक मार्ग बंद झाला आहे.