ढवळीकर वीज, हळर्णकर मच्छीमार तर फळदेसाई समाजकल्याणमंत्री : महत्वाच्या महामंडळांवरही आमदारांची वर्णी
प्रतिनिधी / पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या विस्तारित मंत्रिमंडळातील तिघा मंत्र्यांना काल मंगळवारी खातेवाटप करण्यात आले. त्याचबरोबर राज्यातील महत्वाच्या महामंडळांच्या अध्यक्षपदी आमदारांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. सुदिन ढवळीकर यांना महत्वपूर्ण वीज खाते देण्यात आले आहे, तर नीळकंठ हळर्णकर आणि सुभाष फळदेसाई यांना अनुक्रमे मच्छीमार आणि समाजकल्याण ही प्रमुख खाती देण्यात आली आहेत. ढवळीकर यांना वीज खाते मिळाले असले तरीही ज्येष्ठतेच्या क्रमवारीत मात्र ते दहाव्या स्थानी पोहोचले आहेत. गत सरकारात ते उपमुख्यमंत्रीपदासह द्वितीय स्थानी होते.
सुदिन ढवळीकर
वीज, गृहनिर्माण, नवीन व नूतनीकरणीय उर्जा
नीळकंठ हळर्णकर
मच्छीमारी, पशुसंवर्धन व पशुचिकित्सा, कारखाने व बाष्पक
सुभाष फळदेसाई
समाजकल्याण, पुरातत्व व पुराभिलेख, नदी परिवहन
पहिल्या टप्प्यात नऊ मंत्र्यांचा समावेश
दि. 28 मार्च रोजी झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्र्यांसह नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर दि. 9 एप्रिल रोजी विस्तारित मंत्रिमंडळात सुदिन ढवळीकर, नीळकंठ हळर्णकर व सुभाष फळदेसाई यांचा समावेश करून घेण्यात आला.
पहिल्या मंत्र्यांना 3 रोजी मिळाली खाती
पहिल्या टप्प्यातील मंत्र्यांना दि. 3 एप्रिल रोजी खातेवाटप करण्यात आले होते. त्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना गृह, अर्थ, पर्सोनेल, दक्षता, राजभाषा ही खाती देण्यात आली होती. द्वितीय स्थानी विश्वजित राणे यांच्याकडे आरोग्य, शहर विकास, नगर नियोजन, महिला व बालविकास आणि वन या खात्यांचा ताबा देण्यात आला होता.
माविन गुदिन्हो यांना वाहतूक, उद्योग, पंचायत राज, शिष्टाचार तर रवी नाईक यांना कृषी, हस्तकला, नागरी पुरवठा खाते मिळाले. नीलेश काब्राल यांना विधीमंडळ कामकाज, पर्यावरण, कायदा व न्याय आणि सार्वजनिक बांधकाम मिळाले. सुभाष शिरोडकर यांना जलस्रोत, सहकार आणि प्रोव्हेदोरिया तर रोहन खंवटे यांना पर्यटन, माहिती तंत्रज्ञान आणि मुद्रण व लेखनसामुग्री ही खाती मिळाली. गोविंद गावडे यांच्याकडे क्रीडा, कला व संस्कृती आणि ग्रामीण विकास तर आतानासियो मोन्सेरात यांना महसूल, श्रम आणि कचरा व्यवस्थापन ही खाती देण्यात आली आहेत.