प्रतिनिधी / मडगांव
सासष्टी तालुक्यातील एका विवाहितेवर कैकदा लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पश्चिम बंगालातील नाबा कुमार सरदार या 26 वर्षीय आरोपीला मायणा कुडतरी पोलिसांनी पश्चिम बंगालात जाऊन जेरबंद केले आहे. पश्चिम बंगालमधून हा आरोपी गोव्यात येऊन पीडित महिलेच्या नातेवाईकाकडे राहून लागला होता आणि या काळात या आरोपीने पीडित विवाहीत महिलेकडे सूत जमविले आणि त्याने तिच्यावर 9 जून ते 20 जूनपर्यंत कैकदा लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर आरोपीने आपण, आपल्या प. बंगालातील घरी घेऊन जातो असे सांगून तिला प. बंगालात घेऊन गेला.
दरम्यान, या विवाहीत महिलेच्या पतीने मायणा कुडतरी पोलीस स्थानकात तक्रार करुन संभाव्य परिस्थितीची कल्पना दिली होती. आरोपी पीडित महिलेला प. बंगालातील एका रेल्वे स्थानकावर उतरताच रेल्वे पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले होते. मात्र, वरील आरोपी पोलिसांना चकमा देण्यास यशस्वी ठरला होता. आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केलेला असल्यामुळे या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी सर्वत्र बिनतारी संदेश पाठवलेले होते. त्यातच या पोलीस स्थानकाहून एक खास पोलीस पथक प. बंगालला पाठवण्यात आले होते. त्या खास पथकाने या आरोपीला अटक करुन गोव्यात आणले आहे.