विमानातील प्रवाशावर लघुशंका केल्याचा आरोप
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये वृद्ध महिलेवर लघुशंका केल्याप्रकरणी आरोपी असलेल्या शंकर मिश्राला मंगळवारी जामीन मिळाला आहे. पतियाळा हाउस न्यायालयाने शंकर मि मिश्राची 1 लाख रुपयांच्या बाँडवर सुटका करण्याचा आदेश दिला आहे. शंकर मिश्रा हा 6 जानेवारीपासून कोठडीत होता.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश हरज्योत सिंह भल्ला यांनी आरोपीच्या जामीन अर्जावर निर्णय दिला आहे. यापूर्वी न्यायालयाने सोमवारी अर्जावरील सुनावणी पूर्ण केल्यावर निर्णय राखून ठेवला होता. दिल्ली पोलिसांनी मिश्रावर चौकशीत सहकार्य न करण्याचा आरोप करत जामीन अर्जाला विरोध दर्शविला होता.
शंकर मिश्राने 26 नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्कहून दिल्लीच्या दिशेने प्रवास करणाऱया एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये मद्यधुंद अवस्थेत एका महिला प्रवाशावर लघुशंका केल्याचा आरोप आहे. तपास यंत्रणेने ज्या साक्षीदाराच्या नावाचा उल्लेख केला आहे, तीच कथित पीडितेच्या दाव्याची पुष्टी देत नाही. तक्रारकर्त्याचे वक्तव्य आणि इला बॅनर्जी (साक्षीदार) यांच्या साक्षीमध्ये विरोधाभास असल्याचे न्यायाधीश भल्ला यांनी सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून घेतल्यावर म्हटले होते.
तक्रारदार महिलेने घटनेनंतर तिकिटाची भरपाई मागितली होती. तसेच आरोपीच्या विरोधात कुठल्याही प्रकारची कारवाई न करण्यासंबंधी सहमत झाली होती असा युक्तिवाद आरोपी शंकर मिश्राच्या वकिलाने न्यायालयासमोर केला आहे.
एअर इंडियाच्या फ्लाइटमधील घटना समोर आल्यावर डीजीसीएने एअरलाइन्सवर 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. तसेच वैमानिकाचा परवाना 3 महिन्यांसाठी निलंबित केला होता. दुसरीकडे एअरलाइन्सचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात फ्लाइटच्या चालक दलाच्या सदस्यांपैकी 4 जणांना तसेच एका वैमानिकाला सेवेतून हटविले आहे. तसेच त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याचबरोबर एअरलाइन्स स्वतःच्या ड्रिंक्स सर्व्ह करण्याच्या धोरणाचीही समीक्षा करत आहे.