तंबाखू नियंत्रण विभाग, मनपा-पोलिसांची संयुक्त कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
कोटपा कायद्याअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारासह शाळा व महाविद्यालयांच्या आवारात तंबाखूची विक्री करत असलेल्या 28 दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्याकडील तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. तंबाखू नियंत्रण विभाग, महापालिका व पोलीस विभागाच्यावतीने ही कारवाई करण्यात आली.
शाळा-महाविद्यालयांच्या 100 मीटरच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे हा कायद्याने गुन्हा आहे. याबाबत अनेकवेळा जनजागृती करण्यात आली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. शनिवारी न्यायालयाच्या बाजूला असलेल्या अंजुमन महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या दुकानातून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यात येत होती. त्याठिकाणी धाड टाकून तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले.
याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवाराचा परिसर आणि इतर ठिकाणी दुकानांची तपासणी करून कोटपा कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे आणि तंबाखू नियंत्रण विभागाच्या मार्गदर्शनाखाली तंबाखू नियंत्रण अधिकारी श्वेता पाटील, कविता राजण्णावर, रमेश हुल्लीकेरी, महानगरपालिकेच्या रिया सनदी, प्रदीप जोगळे यांनी ही कारवाई केली आहे.