महापालिकेच्या अतिक्रमण व इस्टेट विभागाकडून कारवाई
प्रतिनिधी/कोल्हापूर
सोमवारपासून सुरु होत असलेल्या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून अंबाबाई मंदिर परिसरात नियोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून शनिवारी या परिसरातील पटट्य़ाच्या बाहेर आलेले साहित्य अतिक्रमण विभागाने जप्त केले.
यंदा निर्बंधमुक्त नवरात्र उत्सव साजरा होत असल्याने महापालिकेकडून गेल्या पंधरा दिवसापासून नियोजन सुरु आहे. अंबाबाई मंदिर परिसरात कोणताही अडथळा होऊ नये याची दखल घेण्यात येत आहे. यापूर्वीच महापालिका आणि पोलीस प्रशासनाने दुकानदार, फेरीवाल्यांच्या बैठका घेऊन सूचना केल्या आहेत. उत्सव काळात दुकानदारांनी आपले साहित्य रस्त्यावर लावू नये असे आवाहन केले आहे. तसेच साहित्य रस्त्यावर आल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.
शनिवारी महापालिकेच्या अतिक्रमण आणि इस्टेट विभागाने महाद्वार आणि जोतिबा रोडवर पाहणी केली. त्यावेळी काही दुकानदारांचे साहित्य पटटय़ाच्या बाहेर आल्याचे निदर्शनास आले. यामुळे महापालिकेने असे साहित्य जप्त केले. यावेळी इस्टेट विभागाचे अधिकारी सचिन जाधव आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.