भय अन् विभागणी विरोधातील यात्रा ः हिंदीभाषिक पट्टय़ात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा
वृत्तसंस्था / कुरुक्षेत्र
काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा सध्या हरियाणात पोहोचली आहे. खासदार राहुल गांधी या यात्रेचे नेतृत्व करत असून त्यांनी रविवारी यात्रेदरम्यानच्या 10 व्या पत्रकार परिषदेला संबोधित पेले आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये यात्रेला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मग महाराष्ट्रातीलही चांगला प्रतिसाद दिसून आला. हिंदीभाषिक पट्टय़ामध्ये लोकांचे समर्थन मिळणार नसल्याचे भाजपकडून बोलले जात होते, परंतु हिंदीभाषिक पट्टय़ातही यात्रेला लोकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी यावेळी केला आहे.
हरियाणाच्या जनतेचे मी आभार मानू इच्छितो. हरियाणातील रस्त्यांवर चालून आम्ही येथे सत्य पाहिले आहे. हिंदुस्थानात भय फैलावले जात असून एका धर्माला दुसऱया धर्माशी लढविले जातेय. याच सर्वांच्या विरोधात ही यात्रा असल्याचे उद्गार राहुल यांनी काढले आहेत.
गरीबांसोबत वाटचाल
या यात्रेचे एक उद्दिष्ट वैयक्तिक देखील आहे. आम्ही या यात्रेकडे तपस्या म्हणून पाहत आहोत. आम्ही गरीब लोकांसोबत चालू इच्छितो. यात्रेमुळे राजकीय लाभ होणार का नुकसान यावर मी काहीच बोलू शकत नाही. हिंदुस्थानात आर्थिक स्वरुपात भेदभाव होत आहे. प्रसारमाध्यमे आणि अनेक संस्था दोन-तीन लोकांच्या हातात एकवटल्या आहेत. याच्याच विरोधात ही यात्रा आहे. देशात सध्या भयावह पद्धतीने बेरोजगारी आणि महागाई वाढत आहे. यात्रेनंतर आणखी एक काम होणार असून त्यासंबंधी लवकरच कळेल असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
यात्रा सुरु होण्यापूर्वी अणि आतापर्यंत किती फरक पडला अशी विचारणा राहुल गांधींना पत्रकारांनी केली होती. पक्ष अन् माझ्यात किती फरक पडला हे लोकांनीच ठरवावे. याचा निर्णय मी घेणार नाही. राहुल गांधी कोण आहे आणि त्याच्यात किती बदल घडला हे लोकांनीच ठरवावे असे ते म्हणाले.
लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न
आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असा प्रश्न विचारण्यात आला. यावर आमचे लक्ष्य केवळ यात्रेचे असून काहीजण लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. यात्रेचे वृत्तांकन करू नका असे प्रसारमाध्यमांना सांगण्यात आले. परंतु सोशल मीडियावर यात्रेला मोठी प्रसिद्धी मिळतेय. राष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये यात्रेसंबंधी काहीच दिसत नसल्याचा दावा राहुल यांनी केला आहे.
काँग्रेस संघटन
काँग्रेस पक्षाची संघटनशक्ती नसल्याचे म्हणणे चुकीचे ठरणार आहे. पक्षसंघटन तुम्हाला रस्त्यांवर दिसत असेल. मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, मी पक्षाध्यक्ष नाही. हरियाणातील काँग्रेस संघटनात कधी सुधारणा होणार हा प्रश्न खर्गे यांना विचारणे योग्य ठरेल असे राहुल यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हटले आहे.
मोदींना प्रश्न विचारू शकता का?
छत्तीसगडमधील कायदा-सुव्यवस्थेवरून राहुल यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर राहुल यांनी पत्रकारांना उद्देशून तुम्ही नरेंद्र मोदींना हा प्रश्न विचारू शकता का अशी उलट विचारणा केली. देशाच्या जनतेत फूट पाडून द्वेष पसरविला जत आहे. काँग्रेस पक्ष कधीच हे करत नाही. छत्तीसडगमधील घटनेची माहिती घेतल्यावर त्याबद्दल बोलणार असल्याचे ते म्हणाले. छत्तीसगडमध्ये धर्मांतरावरून मोठा गदारोळ सुरू आहे. धर्मांतराच्या विरोधात अनेक आदिवासी समुदाय एकवटले असून त्यांनी आंदोलन चालविले आहे.