वडगाव पशुवैद्यकीय दवाखान्यातील प्रकार : इमारतीलाही धोका निर्माण होण्याची शक्यता
बेळगाव : वडगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या शेजारी स्मार्टसिटी अंतर्गत जलकुंभ उभारला जात आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय दवाखान्यात ये-जा करणे अडचणीचे ठरू लागले आहे. दवाखान्याच्या भिंतीला लागूनच जलकुंभ उभारला जात आहे. त्यामुळे पशुपालकांना जनावरे घेऊन येणे अडचणीचे बनत आहे. स्मार्टसिटी अंतर्गत शहरात 24 तास पाण्याचा पुरवठा करण्यासाठी विविध ठिकाणी जलकुंभ उभारले जात आहेत. वडगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला लागूनच हा जलकुंभ उभारला जात आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय दवाखान्यात ये-जा करणे जिकिरीचे बनू लागले आहे. प्रवेशद्वारावरच हे विकासकाम सुरू असल्याने दवाखान्यात कसे जायचे? असा प्रश्नही पशुपालकांना पडू लागला आहे. आधीच जनावरांना विविध रोगांची लागण होऊ लागली आहे. त्यामुळे पशुपालक अडचणीत आले आहेत. त्यामुळे वेळेत प्रतिबंधक लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. मात्र, दवाखान्यात जाताना विकासकामांच्या अडचणी येत असल्याने पशुपालकांतून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. पशुसंगोपन खात्याने लाळ्या खुरकत, रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. जनावरे, मांजर आणि कुत्र्यांना लस दिली जात आहे. त्यामुळे दवाखान्यात पशुपालकांची ये-जा वाढली आहे. मात्र, प्रवेशद्वारावरच जलकुंभाचे काम सुरू असल्याने अडचणी येऊ लागल्या आहेत. विशेषत: दवाखान्याच्या भिंतीला लागूनच हा जलकुंभ उभारला जात आहे. त्यामुळे पशुसंगोपनच्या इमारतीला देखील धोका निर्माण होण्याची चिंता व्यक्त होत आहे.