श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष भारत पाटणकर यांच्या उपस्थितीत बैठक; महसूल पातळीवरील प्रश्न तातडीने मार्गी लावू – अप्परजिल्हाकारी संजय शिंदे
कोल्हापूर प्रतिनिधी
वारणा व चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्त वसाहतीमधील अत्यावश्यक सोयी, सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा परिषदेकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही सीईओ संजयसिंह चव्हाण यांनी दिली. जि.प.मधील स्व.वसंतराव नाईक समिती सभागृहामध्ये चांदोली व वारण अभयारण्य पुनर्वसन वसाहतीमधील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आढावा बैठक पार पडली. श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष भारत पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सीईओ संजयसिंह चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) अरूण जाधव, उपवनसंरक्षक जि गुरूप्रसाद, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी, संबंधित पंचायत समितींचे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व संबंधित वसाहतीमधील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी वसाहतीमधील नागरिकांचे विविध प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यावर सविस्तर चर्चा झाली. ज्या वसाहती महसुली गांवे म्हणून जाहीर झालेली आहेत. अशा पात्र वसाहतींचे स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याबाबतचे प्रस्ताव तात्काळ शासनास सादर करण्याबाबत मागणी केली. तसेच वसाहतीमधील विविध नागरी सुविधा पुर्ण करण्यासाठी वन विभाग, जलसंपदा विभाग व जिल्हा परिषद तसेच बसाहतीमधील ग्रामस्थांनी समन्वयाने योग्य तो तोडगा काढावा आणि सदरचा प्रश्न त्वरीत मार्गी लावावा असे डॉ. पाटणकर यांनी आवाहन केले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे ाढाsल्हापूर यांनी वसाहतीमधील ग्रामस्थांनी व श्री भारत पाटणकर यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची मुद्देनिहाय उत्तरे देवून सर्वांचे समाधान केले. तसेच या कामी कोणतीहो अडचण आल्यास मी स्वत: यामध्ये लक्ष घालून ती पूर्ण करण्याचे अभिवचन दिले. संबंधित वनविभाग व जलसंपदा विभाग यांनी हस्तांतरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी व नागरी सुविधा पुरविण्यासाठी आवश्यक असणारा निधी जिल्हा परिषद प्रशासनाकडे वर्ग करण्याच्या त्यांनी संबंधितांना दिल्या.
सीईओ संजयसिंह चव्हाण यांनी आढावा बैठकीमध्ये उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांबाबत जिल्हा परिषद प्रशासन सकारात्मक पध्दतीने निर्णय घेवून जिल्हाधिकारी यांचेकडील हस्तांतरण आदेश व ताबा पावती प्रमाणे ग्रामपंचायत दप्तरमध्ये आवश्यक त्या नोंदी घेण्याबाबत कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट केले. याकामी जिल्हा परिषदकडील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व ग्रामीण पाणीपुरवठाचे कार्यकारी अभियंता, वनविभाग व वारणा डावा कालवाकडील अधिकारी तसेच संबंधित वसाहतीमधील प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्रत्यक्ष पाहणी व नागरी सुविधा हस्तांतरण याबाबत जिल्हा परिषद 100 टक्के सकारात्मक असल्याचे सांगितले. या वसाहतीमध्ये जिल्हा परिषदेमार्फत जलजीवन मिशन अतंर्गत विविध कांमाची तरतूद केली असल्याचे सांगून पाणी व स्वच्छता विभागामार्फत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, वयक्तिक शौचालय व सार्वजनिक शौचालयासाठी मागणी प्रमाणे निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली. 13 वसाहतीसाठी महसुली गावांचा दर्जा दिलेला नाही. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने कार्यवाही करावी. 01 मे 2023 महाराष्ट्र दिनी दुपारी 3 वाजता सोनाली वसाहत पेठवडगांव येथे सर्व संबंधित अधिकारी प्रत्यक्ष भेट देणार असल्याचे सीईओ चव्हाण यांनी सांगितले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरूण जाधव यांनी आभार मानले.