आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी निवड
ओटीटीवर अलिकडेच प्रदर्शित ‘जुबली’ आणि ‘ताज’मधील स्वत:च्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकणारी अदिती राव हैदरी आता एका आंतरराष्ट्रीय चित्रपटात दिसून येणार आहे. राष्ट्रीय फिल्म विकास निगम आणि ब्रिटिश फिल्म इन्स्टीट्यूटच्या सहकार्यातून तयार होणारा चित्रपट ‘लायनेस’मध्ये ती महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.
‘लायनेस’ हा ब्रिटनमधील भारतीय महिलेची अद्भूत कहाणी दर्शविणारा चित्रपट आहे. महाराजा रणजीत सिंह यांची नात सोफिया दिलीप सिंह यांच्यावर हा चित्रपट आधारित असणार आहे.
सोफिया यांनी 18 नोव्हेंबर 1910 रोजी एंबलीन पंखर्स्टसोबत मिळून ब्लॅक फ्रायडे मार्चचे नेतृत्व केले होते. ब्रिटिश संसदेबाहेर 400 हून अधिक जणांनी केलेल्या या निदर्शनाने ब्रिटनमध्ये महिलांना मताधिकार मिळवून दिला होता. सोफियांची व्यक्तिरेखा चित्रपटात इतिहासावर आधारित आहे. सोफिया यांच्याबद्दल माहिती मिळविणाऱ्या युवतीच्या भूमिकेत अदिती दिसून येणार आहे. तर सोफिया यांची व्यक्तिरेखा ब्रिटिश अभिनेत्री पेज संधू साकारणार आहे.
लायनेस हा चित्रपट इतिहास अन् वर्तमानाचे संगम घडविणारा चित्रपट ठरणार आहे. वैशाली पाटली, विवेक रंगाचारी, फराज एहसान आणि क्लेअर काहिल यांनी याची निर्मिती केली आहे. तर या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी कजरी बब्बर पार पाडणार आहेत. त्यांनीच याची पटकथा लिहिली आहे.