‘सूर्ययान’ची एल-1 पॉईंटच्या दिशेने वाटचाल, अवकाशातील हवामानाविषयी माहिती मिळणार
► वृत्तसंस्था/ बेंगळूर
इस्रोच्या सूर्ययान मोहीम ‘आदित्य एल-1’ने वैज्ञानिक डेटा गोळा करण्यास सुऊवात केली आहे. अंतराळ यानावर स्थापित केलेले सुप्रा थर्मल आणि एनर्जेटिक पार्टिकल स्पेक्ट्रोमीटर किंवा एसटीईपीएस उपकरण 10 सप्टेंबर रोजी पृथ्वीपासून 50,000 किलोमीटर दूर सक्रिय झाल्यानंतर आता त्याच्याकडून माहिती मिळण्यास प्रारंभ झाला आहे. या माहितीच्या मदतीने सूर्याच्या कक्षेतील वादळे आणि अवकाशातील हवामानाची माहिती उपलब्ध होणार असल्याची माहिती इस्रोकडून सोमवारी देण्यात आली.
एसटीईपीएस (स्टेप्स) साधन हे आदित्य सोलर विंड (सूर्य तुफान) कण प्रयोगाच्या एएसपीईएक्स पेलोडचा भाग आहे. ‘एसटीईपीएस’मध्ये सहा सेन्सर आहेत. प्रत्येक सेन्सर वेगवेगळ्या दिशेने निरीक्षण करतो आणि 1 एमईव्हीपेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स व्यतिरिक्त, 20 केईव्ही/न्यूक्लिओन ते 5 एमईव्ही/न्यूक्लिओन पर्यंतचे सुप्रा-थर्मल आणि ऊर्जावान आयन मोजण्याची प्रक्रिया पार पाडतो.
‘आदित्य एल-1’ 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11.50 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही-सी57 रॉकेटचा वापर करून प्रक्षेपित करण्यात आले. प्रक्षेपणानंतर 63 मिनिटे आणि 19 सेकंदांनी हे यान पृथ्वीच्या 235 किमी × 19500 किमी कक्षेत ठेवण्यात आले. यानंतर अंतराळयानाची कक्षा 3, 5, 10 आणि 15 सप्टेंबर रोजी 4 वेळा थ्रस्टर्स फायर करून वाढवण्यात आली. आता हे ‘सूर्ययान’ ‘आदित्य एल-1’ आपल्या निर्धारित एल-1 पॉईंटच्या दिशेने वाटचाल करत आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर 2 वाजता ते ट्रान्स-लॅग्रॅन्जियन पॉईंट 1 च्या कक्षेत प्रवेश करणार आहे. त्यासाठी वाहनांची थ्रस्टर्स काही काळ प्रज्वलित केली जाणार आहे. येथून अंतराळयान 15 लाख किलोमीटरचा प्रवास सुरू करेल. ते जानेवारी 2024 मध्ये लॅग्रॅन्जियन पॉईंट 1 वर पोहोचेल.