वृत्तसंस्था/ बेंगळूर
‘चांद्रयान-3’ मोहिमेती ‘प्रज्ञान’ला जागृत करण्याची आशा मावळत असली तरी सूर्य मोहिमेवर असलेले ‘आदित्य एल-1’ हे यशाच्या दिशेने सातत्याने पुढे जात आहे. अंतराळातून एक मोठी आनंदाची बातमी आली असून इस्रोने एकप्रकारे मंगळ मोहिमेदरम्यान केलेल्या पराक्रमाची पुनरावृत्ती केली आहे. सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली मोहीम असलेल्या ‘आदित्य एल-1’ अंतराळयानाने पृथ्वीच्या प्रभावक्षेत्रातून यशस्वीरित्या बाहेर पडत सूर्याच्या कक्षेच्या दिशेने पहिले पाऊल टाकल्याचे शनिवारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने सांगितले.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर शुभ बातमी देताना इस्रोने ‘आदित्य एल-1’ आता अर्थ लॅग्र्रेज पॉइंट 1 कडे वाटचाल करत असल्याचे म्हटले आहे. पृथ्वीच्या प्रभावक्षेत्राबाहेर अंतराळयान पाठवण्याची ही सलग दुसरी वेळ आहे. मार्स ऑर्बिटर मोहिमेदरम्यान प्रथमच असे केले गेले, असेही इस्रोने स्पष्ट केले आहे.
सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य एल-1’ हे अंतराळयान 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11.50 वाजता श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले. भारतीय अंतराळ संस्थेने प्रक्षेपित केलेली सूर्याचे निरीक्षण करणारी ही पहिली समर्पित सूर्य मोहीम आहे. ‘आदित्य एल-1’ अंतराळयान सूर्याचा अभ्यास करण्यासाठी एकूण सात वेगवेगळे पेलोड वाहून नेत आहे. त्यापैकी चार पेलोड सूर्यापासून प्रकाशाचे निरीक्षण आणि अभ्यास करणार आहे. ‘आदित्य एल-1’ हे सूर्याच्या दिशेने पृथ्वीपासून 1.5 दशलक्ष किमी अंतरावर असलेल्या एल-1 प्रभामंडल कक्षेत ठेवले जाईल.