मुलांवर विपरित परिणाम होण्याची भीती
प्रतिनिधी /पणजी
कुजिरा-बांबोळी येथील विविध शाळा संकुले असलेल्या आवारात रस्ता दुभाजकांसाठी वापरण्यात आलेल्या साधनांवर मॅजेस्टिक प्राईड कॅसिनोच्या जाहिराती झळकत असून त्यांचा उपयोग तेथे कशासाठी करण्यात आला आहे तेच समजेनासे झाले आहे. शालेय मुलांनी कॅसिनोंत जाणे व धडे घ्यावेत असे तर संबंधित कॅसिने कंपनींना सुचवायचे नसेल ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या वाहतूक पोलिसांनी कॅसिनोची जाहिरात फलक असणारे बॅरिकेटस रस्ता दुभाजकांसाठी वापरले त्यांनी तरी हा विचार करण्याची गरज होती अशी चर्चा पालकांमधून केली जात आहे.
शाळा संकुलात अशा प्रकारे कॅसिनोच्या जाहिराती असणारे फलक वापरणे चुकीचे असून त्याचा विपरित परिणाम शालेय मुलांवर होण्याची शक्यता आहे. खरे म्हणजे ती जाहिरातीबाजीची साधने रस्ता दुभाजकांवर लावण्याची गरजच नाही. कारण मुळात त्या रस्त्यावर दुभाजक आहेच. त्या दुभाजकावर मॅजेस्टिक प्राईड कॅसिनोचे फलक असणारे बॅरिकेटस लावण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे शाळा संकुल आवारातून हे बॅरिकेटस हटविण्याची गरज आहे.