‘सावज’ मिळवून चक्रा खेत्रीला नैवेद्य दाखविल्यानंतर 12 दिवसांचे सुतक
महानैवेद्यास मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी लावली उपस्थिती, 30 पासून सुरू होईल 12 दिवसांचा उत्सव
वार्ताहर/ केपे
शेल्डे, केपे येथील श्नी सातेरी शांतादुर्गा देवस्थानाचा जत्रोत्सव परंपरेनुसार 12 वर्षांनी यंदा साजरा केला जाणार असून ‘सावज’ मिळाल्यानंतर व चक्रा खेत्रीला त्याचा नैवेद्य दाखवल्यानतर गावातील सर्वांसाठी महानैवेद्य होतो. त्यानंतर 12 दिवस उलटल्यावर म्हणजे 30 जानेवारी ते 10 फेबुबारी असे 12 दिवस हा जत्रोत्सव साजरा केला जाणार आहे.
शुक्रवारी या देवालयात झालेल्या महानैवेद्याच्या वेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश क्राबाल, मंत्री सुभाष फळदेसाई, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, आमदार एल्टन डिकॉस्ता, आमदार राजेश फळदेसाई, आमदार उल्हास तुयेकर, आमदार संकल्प आमोणकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, जिल्हा पंचायत सदस्य सिद्धार्थ गावस देसाई व इतर हजर होते.
गोव्यातील दरेका गावातील रितीरिवाज, धार्मिक विधी, परंपरा वेगवेगळ्या असून त्या आजही तितक्यात भक्तिभावाने जपल्या जातात. शेल्डे-केपे या गावातील आराध्य ग्रामदेवता श्नी सातेरी शांतादुर्गा देवीची प्रथा इतर गावांपेक्षा वेगळी आहे. गावातील जत्रोत्सव तब्बल बारा वर्षांना आणि तो सुद्धा ‘सावज’ मिळाले तरच साजरा केला जातो. त्यामुळे या जत्रोत्सवाची सर्वांना उत्सुकता लागून राहिलेली असते. तसेच श्री सातेरी शांतादुर्गा हे जागृत देवस्थान असून त्यामुळे फक्त शेल्डेतच नव्हे, तर केपे तालुक्याबरोबर सर्व गोव्यात या जत्रोत्सवाची उत्सुकता असते. त्यामुळेच खुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत व इतर अनेक मंत्र्यांनी शुक्रवारच्या महानैवेद्याच्या वेळी खास उपस्थिती लावली.
‘सावज’ मिळविण्याची पद्धत
या जत्रोत्सवापूर्वी ‘सावज’ मिळविण्याची पद्धत आहे. त्यानंतर पारंपरिक धार्मिक विधी करून व मिरवणूक काढून चक्री खेत्रीला त्याचा नैवेद्य दाखविला जातो. त्या पद्धतीनुसार, शुक्रवारी महाजन, ग्रामस्थ व इतर सर्वांकरिता महानैवेद्य झाला. यावेळी शेल्डेत मोठय़ा संख्येने भक्तांनी गर्दी केली होती. दर 12 वर्षांनी येणारा हा जत्रोत्सव यापूर्वी 2011 साली साजरा झाला होता. त्यानंतर यंदा 30 जानेवारीपासून 12 दिवस जत्रोत्सव विविध धार्मिक विधींनिशी साजरा होणार आहे.
12 दिवसांच्या सुतकानंतर जत्रोत्सव
जोपर्यंत चक्री खेत्रीला सावजाचा नैवेद्य अर्पण केला जात नाही तोपर्यंत जत्रोत्सव होत नाही. ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली असून आजही तशीच चालू आहे. ‘सावज’ मिळविल्यानंतर 12 दिवस सुतक पाळले जाते. त्यानंतर देवालयाच्या प्रांगणात सावरीच्या झाडाची मुहूर्तमेढ रोवून विधी केले जातात. 12 दिवस पूर्ण झाल्यानंतरच जत्रोत्सवाला सुरुवात होते.
यासंबंधी जि. पं. सदस्य व महाजन सिद्धार्थ गावस देसाई यांनी सांगितले की, शेल्डे गावातील आमचे आराध्य दैवत श्नी सातेरी शांतादुर्गा देवीचा जत्रोत्सव साजरा करण्याची प्रथा इतर गावांपेक्षा वेगळी आहे. यंदाच्या महानैवेद्याला सुमारे 5 हजार इतक्या भाविकांनी उपस्थिती लावल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष परेश गावस देसाई यांनी दिली.